News Flash

दिल्लीमध्ये युपीए-२ स्थापन करण्याच्या हालचाली; संजय राऊतांचा गौप्यस्फोट

"युपीए राज्याचा विषय नाही, त्यामुळे राज्यातील, जिल्हा स्तरावरील लोकांनी केंद्रीय विषयावर बोलू नये"

संग्रहित (PTI)

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी युपीएच्या नेतृत्वासंबंधी केलेल्या वक्तव्यावरुन काँग्रेस नेत्यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. राष्ट्रीय पातळीवर यूपीए बळकट होण्यासाठी त्याचं नेतृत्व काँग्रेसच्या बाहेरील व्यक्तीकडे दिलं पाहिजे. शरद पवार हे अशी क्षमता असलेले नेते आहेत, असं विधान संजय राऊत यांनी केलं आहे. दरम्यान संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना दिल्लीतील काही लोक युपीए-२ स्थापन करण्याच्या तयारीत असल्याचा गौप्यस्फोट केला आहे. यावेळी त्यांनी राज्यातील काँग्रेस नेत्यांनाही चांगलंच सुनावलं आहे.

“शरद पवार या देशाचे नेते आहेत. शरद पवार, उद्धव ठाकरे काय आहेत हे सर्वांना माहिती आहे. युपीएसंबंधी बोलण्यासाठी युपीएमध्ये असायला पाहिजे असं काही नाही. युपीए राज्याचा विषय नाही, त्यामुळे राज्यातील, जिल्हा स्तरावरील लोकांनी केंद्रीय विषयावर बोलू नये. हा राष्ट्रीय विषय असून राष्ट्राच्या हितासाठी या देशात एका मजबूत विरोधी पक्षाची आघाडी स्थापन व्हायची असेल तर मी सांगितलेल्या भूमिकांवर चर्चा होणं गरजेचं आहे. हे जर महाराष्ट्रातील नेत्यांना कळत नसेल तर त्यांनी राजकीय अभ्यास करणं गरजेचं आहे”.

शरद पवारांचे प्रवक्ते आहात का? विचारणाऱ्या काँग्रेसला संजय राऊतांनी दिलं उत्तर; म्हणाले….

पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की, “हा दिल्लीतील चर्चेचा विषय असून महाराष्ट्र किंवा इतर राज्यांमध्ये ती होऊ नये. राष्ट्रीय विषय दिल्लीत चर्चिला जातो आणि तिथेच झाली पाहिजे. या विषयावर सोनिया गांधी, राहुल गांधी बोलणार असतील तर आम्ही त्यांना उत्तर देऊ. पण ते सुद्धा या विषयावर काही बोलत नसून चिंतन करत आहेत”.

“संबंध नसलेल्या विषयावर…,” संजय राऊतांच्या विधानावर नाना पटोले यांची पहिली प्रतिक्रिया

“माझ्यावर कोणी टीका करत नसून ते आपल्या पक्षावरच टीका करत आहेत. या देशात जर एक उत्तम विरोधी पक्षांची आघाडी निर्माण झाली नाही तर तुम्ही भाजपाचा पराभव कसा करणार याचं उत्तर मला प्रश्न विचारणाऱ्यांनी द्यायला हवं. ते दिल्लीत येऊन द्यावं, महाराष्ट्रात देऊ नये. हा विषय राष्ट्रीय आघाडीचा आहे, राष्ट्रीय राजकारणातील आहे. जिल्हा किंवा तालुक्यातील नाही हे समजून घेतलं पाहिजे,” असंही संजय राऊत म्हणाले आहेत. युपीए मजबूत होऊ नये असं जर काँग्रेसच्या महाराष्ट्रातील लोकांना वाटत असेल तर त्यांनी स्पष्ट करावं अशी मागणीदेखील त्यांनी केली.

युपीए २ ची गरज वाटते का? विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, “आतापर्यंत तिसरी, चौथी, पाचवी आघाडी अशा नौटंकी झाल्या आहेत, त्या अपयशी ठरल्या आहेत. त्यामुळे जी आताची आघाडी आहे ती कशी मजबूत होईल हे पाहणं गरजेचं आहे. दिल्लीतील काही लोक युपीए-२ स्थापन करण्याच्या तयारीत आहेत म्हणून त्या चिंतेनं मी हे सांगितलं आहे”.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 26, 2021 11:59 am

Web Title: shivsena sanjay raut upa congress ncp maharashtra government sgy 87
Next Stories
1 शरद पवारांचे प्रवक्ते आहात का? विचारणाऱ्या काँग्रेसला संजय राऊतांनी दिलं उत्तर; म्हणाले….
2 जळगावची पुनरावृत्ती धुळ्यात ?
3 तुटपुंज्या निधीमुळे जिगाव प्रकल्पात ‘सिंचन’ अवघड
Just Now!
X