पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांना भ्रष्टाचारी म्हटल्यामुळे राजकारण तापले आहे. काँग्रेस आणि भाजपामध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. राहुल गांधी यांनी मोदींना कर्म तुमची वाट पाहत आहेत असे सांगितले. त्याच मुद्यावरुन शिवसेनेने आजच्या सामनाच्या अग्रलेखातून राहुल गांधींना वीर सावकरांचा जाहीर अपमान केला त्याची आठवण करुन दिली आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अग्रलेखातून पंतप्रधान मोदींचे समर्थन केले आहे.

राहुल गांधी यांनी मोदींना सांगितले, कर्म तुमची वाट पाहत आहे. मोदी यांनी सावरकरांबाबतचे राहुल गांधींचे कर्म लगेच समोर आणले. राहुल गांधी जाहीर सभांतून मोदींना ‘चोर’ म्हणतात व मोदी यांनी त्याबद्दल गांधींवर फुले उधळावीत किंवा घरी चहापानास बोलवावे अशी कुणाची अपेक्षा आहे काय? असा सवाल अग्रलेखात विचारला आहे. क्रांतिकारकांचे शिरोमणी वीर सावरकर यांच्याविषयी राहुल गांधींनी जे घाणेरडे उद्गार काढून संपूर्ण क्रांतिकारकांचा जो अपमान केला त्याबाबत कुणी वेदना व्यक्त केली आहे काय? असा प्रश्नही विचारण्यात आला आहे.

काय म्हटले आहे अग्रलेखात

– सावरकर हे मृत्युंजय होते, ते महान स्वातंत्र्यसेनानी तर होतेच, पण विज्ञाननिष्ठ हिंदुत्ववादी होते. अशा वीर सावरकरांचा जाहीर अपमान राहुल गांधी यांनी केला. स्वा. सावरकर आज त्यांची बाजू मांडायला हयात नाहीत, पण तरी राहुल गांधी, तुम्ही त्यांचा अपमान करताय. सावरकरांचा त्याग मोठा आहे. त्यांचा अपमान करणाऱ्या राहुल गांधींनाही त्यांच्या कर्माचे फळ पंतप्रधान मोदी यांनी दिले आहे. राजीव गांधी यांची हत्या दुर्दैवीच आहे, पण सावरकरांचा त्याग सदैव प्रेरणादायी आहे. राहुल गांधी यांनी मोदींना सांगितले, कर्म तुमची वाट पाहत आहे. मोदी यांनी सावरकरांबाबतचे राहुल गांधींचे कर्म लगेच समोर आणले.

– पंतप्रधान मोदी यांच्या एका वक्तव्यावरून सध्या टीकेचे काहूर माजले आहे. राहुल गांधी यांना उद्देशून पंतप्रधान म्हणाले की, ‘‘तुमचे पिताजी ‘मि. क्लीन’ म्हणून राजकारणात डांगोरा पिटत आले, पण ‘भ्रष्टाचारी नंबर एक’ म्हणून शेवटी त्यांचा अंत झाला.’’ ‘‘मोदी यांना असे बोलणे शोभत नाही, राजीव गांधी हे आज हयात नाहीत, देशासाठी त्यांनी बलिदान केले आहे’’ असा सूर यानिमित्ताने लावला जात आहे. मोदी हे वाटेल ते बोलतात, त्यांना दुसऱ्यांविषयी आदर नाही असेही काही जणांचे म्हणणे आहे. पंतप्रधानपदावरील व्यक्तीने संयम पाळला पाहिजे हे मान्य, पण संयमाची टाळी एका हाताने वाजत नाही. मोदी हे काही महात्मा गांधी किंवा विनोबा भावे नाहीत. ते एक पक्के कसलेले राजकारणी आहेत. मुख्य म्हणजे ते हजरजबाबी आहेत. राहुल गांधी त्यांना जाहीर सभांतून ‘चोर’ म्हणतात व मोदी यांनी त्याबद्दल गांधींवर फुले उधळावीत किंवा घरी चहापानास बोलवावे अशी कुणाची अपेक्षा आहे काय?

– पंतप्रधान मोदी यांनी राजीव गांधींविषयी केलेले विधान चुकीचे आहे हे एकवेळ मान्य करू, पण क्रांतिकारकांचे शिरोमणी वीर सावरकर यांच्याविषयी राहुल गांधींनी जे घाणेरडे उद्गार काढून संपूर्ण क्रांतिकारकांचा जो अपमान केला त्याबाबत कुणी वेदना व्यक्त केली आहे काय? एका जाहीर सभेत राहुल गांधी यांनी वीर सावरकर हे ब्रिटिशांची माफी मागून कसे सुटले याची नक्कल करून सादरीकरण केले होते. त्यांना आता पंतप्रधानांनी त्यांचे ‘कर्म’च दाखवले. राजीव गांधी हे तामीळ दहशतवाद्यांच्या हल्ल्यात मारले गेले. राहुल व प्रियंकाच्या डोक्यावरील पित्याचे छत्र हरपले याचे दुःख सगळ्यांनाच आहे.

– राजकारणात येण्यापूर्वी राजीव गांधींनी कोणतेही मोठे देशकार्य केले नव्हते. त्यामुळे देशासाठी त्याग वगैरे शब्द त्यांच्यापासून खूप दूरचे आहेत. इंदिरा गांधी यांच्या निर्घृण हत्येनंतर राजीव गांधी थेट पंतप्रधान झाले व नंतर त्यांचे राजकारण व जीवनही दुर्दैवाने संपले, पण वीर सावरकरांचे तसे नव्हते. वयाच्या चौदाव्या वर्षी त्यांनी घरातील अष्टभुजा देवीपुढे देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ब्रिटिशांविरुद्ध मरेपर्यंत झुंजण्याची व प्रसंगी बलिदानाची शपथ घेतली. पुढे सावरकरांनी सशस्त्र क्रांतीची तयारी केली व इंग्रज सरकार उलथवून टाकण्यासाठी क्रांतिकारकांची जमवाजमव सुरू केली होती. सावरकरांची दहशत घेतलेल्या इंग्रज सरकारने सावरकरांना दोनवेळा जन्मठेप म्हणजे पन्नास वर्षांच्या काळ्या पाण्याची शिक्षा ठोठावली व त्यांना अंदमानला पाठवले.

– सावरकरांना पाहून अंदमानचा तुरुंग अधिकारी कुचेष्टेने हसला व म्हणाला, ‘‘आता येथून तुझा मृतदेहच बाहेर पडेल.’’ यावर सावरकर ताडकन म्हणाले, ‘‘पण तोपर्यंत इंग्रजांची राजवट माझ्या देशावर राहील काय?’’ काय हा आत्मविश्वास! ‘‘माझ्या देशातील क्रांतिकारक इंग्रजांची जुलमी राजवट उलथवून टाकतील, अंदमानचे दरवाजे उघडतील व आम्ही स्वतंत्र होऊ’’ हाच आत्मविश्वास आणि इच्छाशक्ती वीर सावरकरांचा दहा वर्षे अंदमान तुरुंगातील सोबती होता. दहा वर्षे त्यांनी तिथे भयंकर यातना भोगल्या. त्याच्या तोळाभर जरी यातना ‘गांधी’ परिवाराने भोगल्या काय? पंडित नेहरू स्वातंत्र्यलढ्यातले बिनीचे सरदार होते. त्यांच्या नशिबी तुरुंगवास आला, पण तो सावरकरांप्रमाणे अंदमानी काळ्या पाण्याचा नव्हता.

– अंदमानच्या काळकोठडीत दहा वर्षे यातना भोगल्यावर राजकारणात सहभागी होणार नाही या शर्तीवर इंग्रजांनी त्यांची मुक्तता केली. ही इंग्रजांसमोर शरणागती किंवा माफीनामा नव्हता तर ती एक तात्पुरती व्यवस्था होती. पंतप्रधान मोदी यांनी राजीव गांधींविषयी जे उद्गार काढले ते आचारसंहितेचा भंग करणारे नाहीत अशी ‘क्लीन चिट’ आता निवडणूक आयोगाने मोदी यांना दिली आहे. मात्र राहुल गांधी यांनी स्वा. सावरकरांविषयी जे अपमानास्पद उद्गार काढले, कृती केली त्याबद्दल त्यांना कधीही ‘क्लीन चिट’ मिळू शकणार नाही. सावरकर हे मृत्युंजय होते, ते महान स्वातंत्र्यसेनानी तर होतेच, पण विज्ञाननिष्ठ हिंदुत्ववादी होते. गाय ही देवता नसून ती एक उपयुक्त पशू असल्याचा विचार त्यांनी मांडला. जाती प्रथेविरुद्ध ते लढले आणि देशाच्या फाळणीच्या विरोधात उभे राहिले. अशा वीर सावरकरांचा जाहीर अपमान राहुल गांधी यांनी केला. त्यांचे हे सावरकरांचा अपमान करणारे व्हिडीओ आम्ही निवडणूक प्रचारात जाहीर सभांतून दाखवले तेव्हा ‘शेम शेम’चे नारे लोकांनी लावले. स्वा. सावरकर आज त्यांची बाजू मांडायला हयात नाहीत, पण तरी राहुल गांधी, तुम्ही त्यांचा अपमान करताय. सावरकरांचा त्याग मोठा आहे. त्यांचा अपमान करणाऱया राहुल गांधींनाही त्यांच्या कर्माचे फळ पंतप्रधान मोदी यांनी दिले आहे. राजीव गांधी यांची हत्या दुर्दैवीच आहे, पण सावरकरांचा त्याग सदैव प्रेरणादायी आहे. राहुल गांधी यांनी मोदींना सांगितले, कर्म तुमची वाट पाहत आहे. मोदी यांनी सावरकरांबाबतचे राहुल गांधींचे कर्म लगेच समोर आणले.