नाणार रिफायनरी प्रकल्पासाठी नेमण्यात आलेल्या सुकथनकर समितीचे कामकाज शिवेसनेकडून थांबवण्यात आले. शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने सुकथनकर समितीची भेट घेत कामकाज स्थगित करण्याची मागणी केली. यावेळी आमदार उदय सामंत, राजन साळवींसह शिवसेना कार्यकर्ते उपस्थित होते. शिवसैनिकांनी यावेळी घोषणाबाजी केली.

केंद्र सरकारने हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी भूसंपादन करण्याकरिता केंद्रिय समिती नेमली आहे. भूसंपादनाचा संपूर्ण आराखडा ही समिती तयार करणार असून महाराष्ट्राचे माजी सचिव द. म. सुकथनकर समितीच्या अध्यक्षपदी नियुक्त झाले आहे. खासदार राऊत यांनी समितीने सरकारी कार्यालयाचा वापर करण्यावर आक्षेप घेतला.

नाणार रिफायनरी प्रकल्पाला प्रकल्पग्रस्तांचा तसेच परिसरातील ग्रामस्थांचा तीव्र विरोध आहे. त्यामुळे द. म. सुकथनकर यांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय समितीला नाणारला पाठवू नये, असे निवेदन याआधी खासदार विनायक राऊत यांनी जिल्हाधिकारी यांना दिले होते. या समितीला प्रकल्प परिसरात पाय ठेऊ देणार नाही आणि तरीही समिती आलीच तर पुढे जे होईल त्याला शासन जबाबदार असेल, असा इशाराही त्यांनी दिला होता.