काम त्वरित सुरू करण्याची मागणी

विधानसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार नरेंद्र मेहता यांचा पराभव होण्याच्या विविध कारणांपैकी एक असलेल्या बाळासाहेब ठाकरे कलादालनाच्या विषयावर शिवसेना पुन्हा एकदा आक्रमक झाली आहे. स्थायी समितीने कलादालनाचा विषय नाकारल्यानंतर या प्रस्तावावर निर्णय घेण्याचे अधिकार आयुक्तांना आहेत. या अधिकारात आयुक्तांनी कलादालनाचे काम त्वरित सुरू करावे अशी आक्रमक भुमिका शिवसेनेने घेतली आहे.

भाजपचे उमेदवार नरेंद्र मेहता यांचा विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर शिवसेना आक्रमक झाली आहे. निवडणुकीआधी कलादालनाच्या विषयावरून मीरा-भाईंदर महानगरपालिकेत रणकंदन झाले होते. कलादालनाचा विषय स्थायी समितीच्या बैठकीत घेण्यास सत्ताधारी भाजपने नकार दिल्यानंतर शिवसेनेच्या नगरसेवकांनी आणि कार्यकर्त्यांनी महापौर दालनासह मुख्यालयात तोडफोड केली होती. नरेंद्र मेहता यांच्या इशाऱ्यावरून कलादालनाचा विषय स्थायी समितीमध्ये घेण्यात आला नाही असा स्पष्ट आरोप शिवसेनेकडून करण्यात आला होता. याचे परिणाम म्हणून शिवसेनेने विधानसभा निवडणुकीत उघडपणे मेहता यांच्या विरोधात काम करून बंडखोर गीता जैन यांना पाठिंबा दिला. त्यामुळे मेहता यांचा निवडणुकीत पराभव झाला.

मेहता यांच्या पराभवानंतर शिवसेनेने कलादालनाचा विषय पुन्हा एकदा महत्त्वाचा मुद्दा बनवला आहे. कलादालनासह अन्य विषयांवर खासदार राजन विचारे आणि आमदार प्रताप सरनाईक यांनी बुधवारी आयुक्तांची भेट घेतली. महापालिकेच्या नियमानुसार प्रशासनाने दिलेला प्रस्ताव स्थायी समितीने घेण्यास नकार दिला तर त्यानंतर ४५ दिवसांनी संबंधित विषयावर निर्णय घेण्याचा अधिकार आयुक्तांना असतो. या नियमाच्या आधारे आयुक्तांनी कलादालनाचे काम करणाऱ्या कंत्राटदाराला त्वरित कार्यादेश देऊन काम सुरू करावे अशी मागणी शिवसेनेकडून करण्यात आली. यावर ४५ दिवसांची मुदत कधी संपते हे तपासून त्यानुसार पुढील निर्णय घेण्याचे आयुक्त बालाजी खतगांवकर यांनी मान्य केले.

नरेंद्र मेहता यांचे थेट नाव न घेता शिवसेनेकडून त्यांना या वेळी लक्ष्य करण्यात आले. प्रशासनाने कोणाचेही वैयक्तिक हित जपण्यासाठी तसेच दबावाखाली काम न करता नियमाच्या चौकटीत राहून निर्णय घ्यावे तसेच महापालिकेच्या विविध विभागांत सुरू करण्यात आलेली ठेकदारी पद्धत रद्द करण्यात यावी अशी मागणी या वेळी करण्यात आली.