मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थान विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर भाजपाने विकासकामांच्या उद्घाटनाला सुरुवात केली असल्याचं दिसत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. यावेळी त्यांच्या हस्ते कल्याण आणि पुण्यात मेट्रो रेल्वेचं भूमिपूजन होणार आहे. मात्र या भूमिपूजन सोहळ्याला शिवसेनेचे नेते अनुपस्थित राहणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, शिवसेनेला भूमिपूजन सोहळ्याचं निमंत्रण देण्यात आलेलं नाही. त्यामुळे शिवसेनेकडून सोहळ्यावर बहिष्कार टाकण्यात आला आहे.

नरेंद्र मोदी सकाळी दिल्लीहून विशेष विमानाने मुंबई विमानतळावर दाखल होतील. तेथून हेलिकॉप्टरने ते राजभवनावर जातील. व्यंगचित्रकार आर के लक्ष्मण यांच्यावरील एका पुस्तकाचे प्रकाशन करतील आणि त्यानंतर ट्रायडेंट हॉटेलमध्ये एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात सहभागी होतील.

दुपारी नरेंद्र मोदी हेलिकॉप्टरने कल्याणला रवाना होतील. ठाणे-कल्याण-भिवंडी मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे आणि अल्प उत्पन्न गटासाठीच्या गृहनिर्माण योजनेचे भूमिपूजनही नरेंद्र मोदींच्या हस्ते कल्याणमध्ये होईल. संध्याकाळी नरेंद्र मोदी पुण्याला रवाना होतील.

भिवंडी-कल्याण या मेट्रोसाठी निविदा काढण्यात आलेली नसतानाही या प्रकल्पाचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करून नागरिकांची फसवणूक केली जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे. तसेच केवळ भाजप खासदाराचा मतदारसंघ डोळ्यासमोर ठेवून मेट्रोची मार्गिका तयार करण्यात आली आहे. मात्र प्रवासी संख्येच्या दृष्टिकोनातून ही मार्गिका चुकीची असल्यामुळे हा प्रकल्प तोटय़ाचा ठरणार असल्याचा दावाही राष्ट्रवादीने केला आहे. त्याचबरोबर राज्य शासनाने ही मेट्रो भिवंडीकडे वळवून शिवसेनेवर एकप्रकारे कुरघोडी केल्याचा आरोपही राष्ट्रवादीने केला आहे.