जवाहरलाल नेहरु विद्यापीठात (जेएनयू) झालेला हिंसाचार पाहून मला २६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्याची आठवण झाली असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. तोंड झाकून हल्ला करणाऱ्यांचा खरा चेहरा समोर आला पाहिजे असं सांगताना हल्लेखोरांचा शोध घेऊन कारवाई करणं गरजेचं असल्याचं म्हटलं आहे. यावेळी त्यांनी गरज लागल्यास महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची सुरक्षा वाढवली जाईल असं आश्वासन दिलं.

पत्रकार परिषदेत बोलताना उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे की, “हे बुरखाधारी डरपोक होते. जर धाडस होतं तर तोंडावर मुखवटा का लावला होता ? त्यांचा शोध घेऊन कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे. या हिंसाचाराचं कधीच समर्थन होऊ शकत नाही. हा हल्ला पाहिल्यानंतर मला २६ नोव्हेंबरच्या दहशतवादी हल्ल्याची आठवण झाली”.

उद्धव ठाकरे यांनी यावेळी महाराष्ट्रात असा हल्ला खपवून घेतला नसता सांगत अशी कोणतीही गोष्ट महाराष्ट्रात होऊ देणार नाही असं आश्वासन दिलं. उद्धव ठाकरे यांनी अमित शाह यांचं नाव घेण्याचं टाळत आपल्याला राजकारण करायचं नसल्याचं सांगितलं आहे. पोलिसांच्या कारवाईसंबधी बोलताना जर पोलिसांनी योग्य कारवाई केली नाही तर त्यांच्यावरही प्रश्चचिन्ह निर्माण होईल असं म्हटलं. तसंच निष्पक्षपातीपणे चौकशी करणं गरजेचं असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं आहे. गरज वाटल्यास राज्यातील विद्यार्थ्यांची सुरक्षा वाढवू असं आश्वासन उद्धव ठाकरेंनी दिलं आहे.