शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा सज्जड इशारा

केडगावच्या दुहेरी हत्याकांडाचा संदर्भ देत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शहरातील लोकप्रतिनिधींची गुंडागर्दी मोडून काढु, गुंडागर्दी केली तर याद राखा, नगरच्या अब्रुचा प्रश्न निर्माण होऊ देणार नाही, नगरचे दुहेरी हत्याकांड आपण विसरु शकणार नाही, सत्ता आहे म्हणुन शिवसेना सूडाने वागणार नाही, परंतु अन्याय झाला तर त्याला तोडून  मोडून  काढू, असा सज्जड इशारा दिला.

नगर शहरातील, टिळक रस्त्यावरील नंदनवन लॉन्समध्ये ठाकरे यांची बुधवारी रात्री प्रचार सभा आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी ते बोलत होते. नगरचे पक्षाचे उमेदवार अनिल राठोड, महापौर बाबासाहेब वाकळे, भाजपचे खा. डॉ. सुजय विखे, श्रीगोंद्यातील भाजपचे उमेदवार बबनराव पाचपुते, ठाकरे यांचे चिरंजीव तेजस ठाकरे, संपर्क प्रमुख भाऊ कोरगावकर, जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे, शहरप्रमुख दिलीप सातपुते तसेच पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

भाजपबरोबर युती केली नसती तर देश कोणाच्या हाती जाणार होता, हे लक्षात घेऊनच युती केल्याचे ठाकरे यांनी स्पष्ट केले. काँग्रेसचे नेते सलमान खुर्शीद यांनी पक्षाला भवितव्य नाही, असा उल्लेख केला, त्याचा संदर्भ देत ठाकरे यांनी ज्या पक्षांना स्वत:चेच भवितव्य राहील असे वाटत नाही, ते काय तुमचे भविष्य घडवणार, काँग्रेसचा सेनापतीच बँकॉकला पळून गेल्यावर काँग्रेस आता लुटुपुटीची लढाई करत आहे, असाही टोला ठाकरे यांनी लगावला. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेला राजीनामा व नंतर भावनाविवश झाल्याचा उल्लेख करुन ठाकरे यांनी दगडाला पाझर फुटल्याचे ऐकले होते, ते प्रथमच पाहिले, असा टोला ठाकरे यांनी लगावला. ठाकरे म्हणाले, शेतकरी जेव्हा न्याय मागत होता, त्यावेळी त्यांना का रडू फुटले नाही, जनता जेव्हा शरद पवार व अजित पवार यांना सत्तेचा शेंदूर  फासत होती, त्यावेळी सत्तेपायी नादान झालेल्यांकडून शेतकऱ्यांची आठवण कधी झाली नाही, कळमकर यांच्यासारखी प्रेम करणारी माणसेही दिसली नाहीत.

उमेदवार राठोड म्हणाले, शहरातील २५ वर्षांचा काळ हा सुवर्णकाळ होता, परंतु तो गेल्या पाच वर्षांत झाकोळला गेला, शहराला पुन्हा वैभव प्राप्त करुन देण्यासाठी आपली उमेदवारी आहे. गेल्या पाच वर्षांत खोटे गुन्हे दाखल करण्याचे प्रकार वाढले होते, शिवसेनेची सत्ता आल्यावर खोटे गुन्हे दाखल होणार नाहीत. राठोड यांचे भाषण सुरु असताना श्रोत्यांतून लालदिव्याचा उल्लेख केला जात होता. त्यावर राठोड यांनी ठाकरे यांनी तसे कबूल  केल्याची ग्वाही दिली.

खा. विखे यांची टोलेबाजी

भाजपचे खा. डॉ. सुजय विखे यांनी भाषणात जोरदार टोलेबाजी केली. विखे यांनी राठोड यांच्या वयाचा उल्लेख करत त्यांना शेवटचा चौकार मारल्यावर थांबा व इतरांना संधी द्या, अशीही सूचना केली. राठोड थांबले म्हणजे इतरांचा नंबर लागेल, त्यासाठी त्यांनी वाट पाहणाऱ्यांना शब्द द्यावा, फक्त दिलेला शब्द दुसऱ्याला कळू देऊ नका, म्हणजे काहीच अडचण होत नाही, आम्ही अशाच पद्धतीने राजकारण करतो, असे विखे म्हणाले. नगरचे राजकारण विचित्र आहे, दिवसा भाषणे ठोकणारे रात्री एकत्र बसतात, ते कोठे एकत्र बसतात हे केवळ विखे यांनाच ठाऊक असते. आपल्या निवडणुकीच्या वेळी शहरात एकही सभा घेतली नाही मात्र शिवसेनेने प्रामाणिकपणे काम केले. आता राठोड यांच्या निवडणुकीत  कोणी बरोबर नसले तरी आपण प्रामाणिकपणे काम करु.