राज्यपालांनी मंदिर उघडण्यासंबंधी लिहिलेल्या पत्रावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या उत्तरावर विरोधी पक्षातील नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. माजी मुख्यमंत्री आणि विधानसभा विरोधी पक्षनेते यांनी हे दुर्दैवी असल्याचं म्हणत टीका केली. यानंतर त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनीदेखील ट्विट करत महाराष्ट्रात बार आणि लिकर शॉप्स सगळीकडे सुरु झाली आहेत, मग मंदिरं काय डेंजर झोनमध्ये आहेत का? असा प्रश्न विचारला. दरम्यान त्यांनी उद्धव ठाकरेंवर केलेल्या टीकेविरोधात शिवसेना महिला आघाडी आक्रमक झाली आहे.

शिवसेनेच्या सभागृह नेत्या विशाखा राऊत यांनी आम्ही तोंड उघडलं तर अमृता फडणवीसांना तोंड लपवायला जागा राहणार नाही असं म्हटलं आहे. एबीपी माझाला दिलेल्या प्रतिक्रियेत त्यांनी म्हटलं की, “अमृता फडणवीस कोण आहेत? आमदार, खासदार, नगरसेविका की प्रवक्त्या..त्या माजी मुख्यमंत्र्याच्या पत्नी आहेत. त्यांनी त्याच भूमिकेत राहावं. खासदार, आमदार, नगरसेवक, प्रवक्ता असेल तर ऐकून घेऊ. पती मुख्यमंत्री झाल्यावर राजकारणात आलेल्यांनी आम्हाला शिकवू नये”.

“आदित्य ठाकरेंसोबत शिवसेना पक्षाची ही चौथी पिढी राजकारणात आहे. आम्हाला काय करायचं हे शिकवू नये आणि आमचं तोंड उघडू नये. आम्हाला निश्चित संस्कृती आहे. आम्ही तोंड उघडलं तर त्यांना तोंड लपवायला जागा राहणार नाही,” असा इशारा त्यांनी दिला आहे.

आणखी वाचा- “बार आणि लिकर शॉप्स सुरू मग मंदिरं काय डेंजर झोनमध्ये?”

काय म्हणाल्या आहेत अमृता फडणवीस?
“वाह प्रशासन! बार आणि लिकर शॉप्स सुरु झाले आहेत मग मंदिरं काय डेंजर झोनमध्ये आहेत का? अनेकदा असं होतं की बऱ्याच गोष्टींसाठी प्रमाणपत्राचीच गरज लागते”

दरम्यान राष्ट्रवादीच्या रुपाली चाकणकर यांनी राज्यपाल दोन राज्यांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने वागत आहेत हे सुद्धा लोकांच्या नजरेतून सुटत नाहीये अशी टीका केली आहे. “अमृता फडणवीस यांना एवढंच सांगायचं आहे की, हाच प्रश्न आपण गोव्याच्या ठिकाणी विचारु शकता. त्यांनी गांभीर्यानं विचार केला पाहिजे, पण शेवटी कावीळ झालेल्यांना सगळं पिवळंच दिसतं,” असा टोला त्यांनी लगावला आहे.