राज्यात २०१९ च्या विधानसभा निवडणूकीत शिवसेनेचीच सत्ता येईल आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतील असा विश्वास शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत हा आम्ही शिवसैनिकांचा हट्ट आहे असेही ते म्हणाले. ‘एबीपी माझा’ या वृत्तावाहिनीने घेतलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. मात्र भाजपाला आपण अजूनही मोठा भाऊ मानतो, पण आधी ठरल्याप्रमाणे भाजपा केंद्रात मोठा असून राज्यात शिवसेना आहे.

मोदी सरकारविरोधातील पहिला अविश्वास ठराव लोकसभात पडला. ४५१ सदस्यांनी मतदानात सहभाग घेतला होता. मात्र बीजेडी आणि शिवसेनेने मतदानाला गैरहजेरी लावली होती. शिवसेनेचा अविश्वास ठरावात सहभाग न घेण्याचा निर्णय योग्यच होता असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे योग्य वेळी योग्य निर्णय घेतात आणि आम्ही त्याचे पालन करतो. लोकसभेत अविश्वास ठरावात जे चित्रं दिसलं ते आगामी निवडणूकीत उलटं असेल असा दावा राऊत यांनी यावेळी केला. सत्ताधारी पक्षाला बहुमत मिळवणं ही फार मोठी गोष्ट नव्हती. बहुमत विकत घेतलं जातं असा आरोपही त्यांनी यावेळी केला.

संसदेत चांगल्या विरोधकांचीही अतिशय गरज असते. ते काम राहुल गांधी अतिशय चांगल्या पद्धतीने करत असल्याने ते योग्य विरोधक असल्याचे सांगत राऊत यांनी राहुल गांधी यांचे कौतुक केले. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामधील भावा जिंकलस या मथळ्याखाली संसदेतील राहुल गांधींच्या भाषणाचे कौतुक करण्यात आले आहे. याशिवाय भाजपा आणि शिवसेना यांच्यातील राजकीय संबंधांविषयीही त्यांनी काही महत्त्वाची वक्तव्ये केली. भाजपाला इतर राज्यात विविध पक्षांकडून मिळणारा पाठिंबा हा त्या पक्षांची मजबुरी असते असेही ते म्हणाले.