शिवसेनेला मुख्यमंत्रिपदाचा मोह निवडणूक निकालानंतर झाला, शरद पवार यांनी त्यांच्यापुढे मुख्यमंत्रीपदाचे दाणे टाकले ते शिवसेनेने टीपले. अशी टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केली. आमचा सत्तेतला भागीदारच विरोधकांसोबत पळून गेला त्यामुळे आम्ही महाराष्ट्रात सत्ता स्थापन करु शकलो नाही असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटलं आहे. एवढंच नाही तर महाराष्ट्रात आम्ही अजित पवारांना सोबत घेऊन सत्ता स्थापन करण्याचा प्रयत्न केला पण आम्हाला त्यात यश आलं नाही. मात्र महाराष्ट्रात आम्ही अपयशी झालो असं मला मुळीच वाटत नाही असंही अमित शाह यांनी म्हटलं आहे. एका हिंदी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अमित शाह यांनी हे वक्तव्य केलं आहे.

ऑक्टोबर महिन्यात महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक पार पडली आणि त्याच महिन्यात निकालही लागले. महायुतीला म्हणजेच भाजपा आणि शिवसेनेला मिळून जनतेने १६१ जागांवर विजय मिळवून दिला होता. म्हणजेच जनतेने महायुतीलाच कौल दिला होता. मात्र अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रिपद आणि सत्तेत समान वाटा या दोन अटींवरुन भाजपा आणि शिवसेनेमध्ये काडीमोड झाला. त्यानंतर शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत जाऊन सत्ता स्थापन केली. उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले.

महाराष्ट्रात गेल्या महिनाभर घडलेल्या या घडामोडी सगळ्यांनीच पाहिल्या. याबाबतच जेव्हा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना प्रश्न विचारण्यात आला तेव्हा शिवसेनेसोबत अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद वाटून घेण्याचं ठरलंच नव्हतं असं शाह यांनी पुन्हा एकदा सांगितलं. आम्ही प्रत्येक सभेत देवेंद्र फडणवीस हेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील असं सांगितलं होतं. मात्र शिवसेनेने तेव्हा ही अट सांगितली नाही. निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर शिवसेनेने वेगळा निर्णय घेतला. आता आम्ही ज्या साथीदारावर विश्वास ठेवला होता तोच विरोधकांसोबत पळून गेला तर काय करणार? मात्र महाराष्ट्रात जे घडलं त्याला मी अपयश मानत नाही असंही अमित शाह यांनी स्पष्ट केलं.