अशोक तुपे

खासदार सदाशिव लोखंडे विजयी

शिर्डी लोकसभा मतदार संघातील शिवसेनेचे उमेदवार खासदार सदाशिव लोखंडे यांनी काँग्रेसचे उमेदवार आमदार भाऊ साहेब कांबळे यांचा एक लाख वीस हजारांहून अधिक मतांनी पराभव केला. या मतदार संघात त्यांनी दुसऱ्यांदा विजय मिळवला. तर सेनेने विजयाची हॅटट्रिक केली. विखे फॅक्टर ,पंतप्रधान नरेंद्र मोदी लाट यामुळे त्यांचा विजय सुकर झाला. काँग्रेस नेते व माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी निवडणूक प्रतिष्ठेची करून काही उपयोग झाला नाही. त्यांना झटका बसला.

२०१४ च्या निवडणुकीत सेनेचे लोखंडे यांना दोन लाखांचे मताधिक्य मिळाले होते. या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लाट तसेच माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांची मदत मिळूनही या वेळी त्यांचे मताधिक्य घटले. मात्र लोखंडे यांना अकोले विधानसभा मतदार संघ वगळता अन्य नेवासे, श्रीरामपूर, कोपरगाव, शिर्डी या सर्व मतदार संघात मताधिक्य मिळाले. शिर्डीत विखे विरुद्ध माजी महसूलमंत्री व काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात अशी निवडणूक गाजली. थोरात यांनी आमदार कांबळे यांच्या विजयासाठी जोरदार मोहीम उघडली होती. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांची सभा आयोजित केली होती. तरी देखील काँग्रेसचे उमेदवार कांबळे यांचा पराभव झाला.

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत खासदार लोखंडे हे सुमारे दोन लाख मतांनी विजयी झाले होते. पण ते साडेचार वर्षांत मतदार संघात फिरकले नव्हते. त्यामुळे त्याच्याबद्दल नाराजी होती. सेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी राज्यात सर्वप्रथम उमेदवारी जाहीर केली होती. मात्र त्याची उमेदवारी बदलावी म्हणून प्रयत्न झाले. सेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी मात्र त्यास नकार दिला. डॉ. सुजय विखे यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली,त्यानंतर भारतीय जनता पक्षात प्रवेश करून नगर लोकसभा मतदार संघात उमेदवारी मिळविली. त्याचा परिणाम शिर्डीवर झाला. विखे यांनी लोखंडे यांना विजयी करण्याचा शब्द दिला. विखे यांच्यामुळे माजी उपनगराध्यक्ष करण ससाणे यांनी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या सभेपूर्वी एक दिवस अगोदर त्यांनी राजीनामा दिला. तसेच विखे यांनी मतविभागणी करण्यासाठी अनेक उमेदवार रिंगणात उतरविले होते. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी काँग्रेस पक्षात असूनही खासदार लोखंडे यांच्या विजयासाठी सभा घेतल्या.

नगरच्या औद्योगिक वसाहतीतील वखार महामंडळाच्या गोदामात आज मतमोजणी सुरू झाली. पहिल्या फेरीपासून लोखंडे यांना मताधिक्य मिळाले. ते शेवटापर्यंत प्रत्येक फेरीत टिकून राहिले. मतमोजणी सुरू झाल्यानंतर काँग्रेसचे उमेदवार आमदार कांबळे हे निघून गेले. त्यानंतर त्यांचे प्रतिनिधी हळूहळू निघून गेले. मात्र युतीच्या कार्यकर्त्यांत उत्साह होता. नगर लोकसभा मतदार संघातील भाजपचे विजयी उमेदवार डॉ. सुजय विखे यांनी त्यांचे अभिनंदन केले. या वेळी आमदार नरेंद्र दराडे, सचिन तांबे, नितीन कापसे, कमलाकर कोते, अशोक थोरे ,राजेंद्र देवकर आदी उपस्थित होते.

श्रीरामपूर विधानसभा मतदार संघातील मतदारांनी काँग्रेसचे उमेदवार आमदार भाऊ साहेब कांबळे हे स्थानिक उमेदवार असूनही त्यांना मताधिक्य मिळू  शकले नाही. तेथे सेनेचे उमेदवार खासदार लोखंडे यांना १९ हजार मताचे मताधिक्य मिळाले. उपनगराध्यक्ष करण ससाणे यांनी विरोधी भूमिका घेतल्याचा कांबळे यांना तोटा झाला. शिर्डी विधानसभा मतदार संघात लोखंडे यांना सर्वाधिक मताधिक्य मिळाले. सुमारे ६२ हजारांपेक्षा जास्त मताधिक्य त्यांना मिळाले. विखे फॅक्टरमुळे त्यांचा विजय सुकर झाला. ज्येष्ठ काँग्रेस नेते व माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांना मोठा धक्का बसला असून ते काँग्रेस उमेदवार आमदार कांबळे यांना मताधिक्य मिळवून देऊ  शकले नाही. तेथे लोखंडे यांना ७ हजारांचे मताधिक्य मिळाले. कोपरगावातून ४० हजार, नेवासे मतदार संघात २१ हजार मताचे मताधिक्य मिळाले. मात्र अकोले मतदार संघात काँग्रेस उमेदवार कांबळे यांना ३१ हजारांचे मताधिक्य मिळाले. तेथे लोखंडे यांना मोठा फटका बसला. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे, भाजपच्या आमदार स्नेहलता कोल्हे, आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्या मतदार संघात लोखंडे यांना मताधिक्य मिळाल्याने त्यांची राजकीय पत वाढली आहे. मात्र आमदार कांबळे, माजी आमदार भानुदास मुरकुटे, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार चंद्रशेखर घुले, नरेंद्र घुले, शंकर गडाख  यांना मोठा फटका बसला आहे. तर माजी मंत्री मधुकर पिचड, आमदार वैभव पिचड यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

निवडणुकीत लोखंडे यांना निळवंडे कालव्याच्या कामाला गती दिल्याचा फायदा झाला पण अकोले तालुक्यात मात्र त्याचा फटका बसला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लाटेचा त्यांना फायदा झाला. विखे फॅक्टर त्यांच्या कामी आला. मतदार संघात जनसंपर्क नाही हा मुद्दा टिकला नाही.

शिर्डी लोकसभा मतदार संघातील भाजपचे माजी खासदार भाऊ साहेब वाकचौरे यांनी बंडखोरी केली होती. पण मतदारांनी त्यांना डावलले. ते स्पर्धेतही येऊ  शकले नाहीत. त्यांना अवघे ३५ हजार मते मिळाले. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार संजय सुखदान हे तिसऱ्या R मांकावर फेकले गेले. त्यांना अपेक्षित मते मिळाली नाही पण ६२  हजार मतांपर्यंत ते पोहचले. कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार बन्सी सातपुते यांना २० हजार मते मिळाली. प्रदीप सरोदे याना १२ हजार मते मिळाली. सुरेश जगधने यांना सहा हजार मते मिळाली. अपक्ष उमेदवारांना मतदारांनी नाकारले. मतविभागणीसाठी अनेक उमेदवार अपक्ष म्हणून उतरविले होते. त्यांचा काही फायदा झाला नाही. बहुतेक अपक्ष उमेदवारांना एक हजार ते दोन हजार मते मिळाली. ५ हजार मतदारांनी नोटा मतदान नोंदविले.

शिर्डी मतमोजणी अंतिम आकडेवारी

सदाशिव लोखंडे (शिवसेना) – ४,८६,८२०

भाऊसाहेब कांबळे (काँग्रेस )-    ३,६६,६२५