सोलापुरात शिवशाही बसचा भीषण अपघात झाला आहे. अपघातात एका प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला असून, ११ प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींवर सोलापूर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शेटफळ फाट्याजवळ हा अपघात झाला. शिवशाही बस पुण्याहून सोलापूरला येत असताना पहाटे चार वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.
मल्लिकार्जुन आंबुसे असं अपघातात मृत्यूमुखी पावलेल्या व्यक्तीचे नाव आहे. सर्व जखमींना सोलापूरच्या छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले असून एका जखमीचा अपवाद वगळता सर्व जखमींची प्रकृती स्थिर आहे. बिपीन हणमंतु कांबळे (वय २६, रा. भुताष्टे, ता. माढा, जि. सोलापूर) यांची प्रकृती गंभीर असल्याचे वैद्यकीय सुत्रांनी सांगितले.
यासंदर्भात मोहोळ पोलीस ठाण्याकडून मिळालेल्या माहितीनुसार मध्यरात्रीनंतर पुण्याहून सोलापूरकडे येणारी शिवशाही आराम बस (एमएच ४७ वाय २०५०) पहाटे चारच्या सुमारास सोलापूरच्या अलीकडे ५० किलोमीटर अंतरावर मोहोळनजीक शेटफळ फाट्याजवळ आली असता ही बस पुढे एका मालमोटारीवर (एमपी ०९ एचजी २२५८) पाठीमागून आदळली. मालमोटारीला पाठीमागून शिवशाही बस धडकताच जोरदार आवाज आला. मालमोटार इंदुर येथून माल वाहतूक करीत हैदराबादकडे निघाली होती. मालमोटारचालक मो. मौला मो. हैदर (वय ६०, रा. हुमनाबाद, जि. बीदर, कर्नाटक) यांनी मोहोळ पोलिसांना अपघाताची माहिती कळविल्यानंतर पोलिसांनी अपघातस्थळी धाव घेऊन मदतकार्य हाती घेतले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on August 30, 2019 11:58 am