छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन दर्शन घडवणारी शिवसृष्टी सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात उभारण्यात येणार आहे.
आर्ट सर्कल, रत्नागिरी आणि आशय सांस्कृतिक, पुणे यांच्यातर्फे संयुक्तपणे आयोजित पुलोत्सवात शिवशाहिरांचा ‘पुल सन्मान’ पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. त्या निमित्ताने ‘जडणघडण’ मासिकाचे संपादक डॉ. सागर देशपांडे यांनी त्यांची प्रकट मुलाखत घेतली. या वेळी कोकण आणि शिवछत्रपतींचा दृढ संबंध अधोरेखित करत बाबासाहेब म्हणाले की, शिवाजी महाराजांनी आपल्या आयुष्यातील निम्म्यापेक्षा जास्त काळ कोकणात व्यतीत केला. समुद्रमार्गे होऊ शकणारे परकीय आक्रमण थोपवण्यासाठी त्यांनी आरमाराची उभारणी केली. विजयदुर्गसारखे सागरी किल्ले उभारले. त्यांच्या या कार्यकर्तृत्वाचा आलेख भावी पिढय़ांपुढे मांडावा या हेतूने सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात सुकळवाड येथे भव्य शिवसृष्टी उभारण्यात येणार आहे. माजी आमदार परशुराम उपरकर यांनी त्यासाठी पुढाकार घेतला असून आपण सर्व प्रकारे या प्रकल्प उभारणीमध्ये सहभागी होणार असल्याचे शिवशाहिरांनी जाहीर केले. या प्रकल्पाची आखणी बऱ्याच प्रमाणात पूर्ण झाली असून पुढील वर्षी त्याचा पहिला टप्पा नागरिकांसाठी खुला होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या मुलाखतीत बाबासाहेबांनी पुल आणि सुनीताबाईंच्या स्वभावाच्या विविध पैलूंचेही श्रोत्यांना दर्शन घडवले. विलक्षण प्रतिभाशक्ती, निरीक्षणशक्ती, कल्पनाचातुर्य आणि सभ्य व सुसंस्कृत विनोदनिर्मिती हे पुलंचे वैशिष्टय़ होते, तर अतिशय शिस्तप्रिय असलेल्या सुनीताबाईंजवळ कमालीची सहृदयताही होती, असे प्रतिपादन त्यांनी विविध उदाहरणांद्वारे केले.
आर्ट सर्कलतर्फे अध्यक्ष जयंत प्रभुदेसाई, डॉ. रवींद्र गोंधळेकर व अन्य सदस्यांनी मानपत्र व स्मृतिचिन्ह देऊन बाबासाहेबांचा सत्कार केला. डॉ. मेधा गोंधळेकर यांनी प्रास्ताविक केले, तर पूर्वा पेठे यांनी सूत्रसंचालन केले.
महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी देवरूखच्या राजू काकडे हेल्प अ‍ॅकॅडमीला निवृत्त न्यायमूर्ती भास्कर शेटय़े यांच्या हस्ते पुल सामाजिक कृतज्ञता पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. ११ हजार रुपये रोख आणि स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप होते. तसेच माऊली प्रतिष्ठानतर्फे डॉ. शरद प्रभुदेसाई यांनी १० हजार रुपयांचा पुरस्कार दिला. पुरस्कार निवड समितीतर्फे सुहास विध्वांस यांनी निवडप्रक्रिया विशद केली. अ‍ॅकॅडमीचे अध्यक्ष गणेश जंगम यांनी सत्काराला उत्तर देणारे मनोगत व्यक्त केले.
महोत्सवाच्या आजच्या अखेरच्या दिवशी प्रसिद्ध अभिनेता पुष्कर श्रोत्री यांना पुल तरुणाई पुरस्कार देण्यात आला. याप्रसंगी श्रोत्री यांनी ख्यातनाम अभिनेते दिलीप प्रभावळकर लिखित-दिग्दर्शित ‘हसवाफसवी’ हा एकपात्री प्रयोग सादर केला.