अफगाणिस्तानात दहशतवादाचे प्रशिक्षण घेण्यास जाण्यापूर्वी सिकंदराबाद येथे पकडलेल्या शोएब अहमद खान याच्याविषयी सखोल चौकशीसाठी हैदराबाद पोलिसांचे पथक लवकरच हिंगोलीत दाखल होण्याची शक्यता असून, एटीएसकडूनही चौकशी होणार आहे.
जिल्ह्य़ाच्या आखाडा बाळापूर येथील शोएब अहमद खान व यवतमाळ जिल्ह्य़ातील उमरखेड येथील मदस्सर या दोघांना सिकंदराबाद येथे पकडण्यात आले. या दोघांची कसून चौकशी केली जात आहे. शोएब हा िहगोलीत ई-निविदा भरून देण्याचे काम करीत होता. या दरम्यान त्याचे कोणाशी संबंध होते, त्याने फेसबुकच्या माध्यमातून कोणाशी संपर्क साधला, त्याच्या संपर्कात कोण होते याचा तपास पोलीस करीत आहेत. आता एटीएसकडूनही स्थानिक पातळीवर माहिती घेतली जात आहे. यात पथकाने हिंगोलीत काहींची चौकशी केल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. शोएबने ज्या ज्या ठिकाणी काम केले, त्या ठिकाणी एटीएस पथकाने चौकशी केल्याचे समजले. तो नेमके कोणते काम करीत होता. हिंगोलीत बाळापूर येथून रोज किती वाजता व कसा येत-जात होता, याचीही माहिती तपासली जात आहे.
पोलीस अधीक्षक एन. अंबिका यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक पियूष जगताप यांच्या पथकाने आखाडा बाळापूर येथे शोएबच्या आई-वडिलांकडे चौकशी केली. शोएब हिंगोलीत जात-येत होता. परंतु तो काय काम करीत असे, कोणाला भेटत असे, कोणाचे काम करीत असे हे अजून समोर आले नसल्याचे सांगण्यात येते. या पाश्र्वभूमीवर हैदराबाद पोलिसांच्या पथकाच्या हाती काय लागले व काय माहिती मिळाली, यावरच पुढील तपासाची दिशा अवलंबून राहणार आहे.