लोकसभा निवडणुकीत शिवसेना, भारतीय जनता पक्षाचे उमेदवार खासदार सदाशिव लोखंडे यांना श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातून ५२ हजारापेक्षा  जास्त मताधिक्य मिळाल्याने काँग्रेस पक्षाला धक्का बसला असून राष्ट्रवादीला मात्र उकळ्या फुटत आहेत.
काँग्रेसचे आमदार भाऊसाहेब कांबळे व जिल्हाध्यक्ष जयंत ससाणे यांच्या प्रभावक्षेत्रात मोठी पिछेहाट तर झालीच, पण मतदारसंघातील कृषिमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या प्रभावक्षेत्रातील गावातही काँग्रेसची धूळधाण झाली. विखे फॅक्टर प्रवरा परिसरातील गावात चालला नाही, त्यामुळे लोखंडे यांचे मताधिक्य मोठय़ा प्रमाणावर वाढले आहे. राष्ट्रवादीचे माजी आमदार भाऩुदास मुरकुटे यांनी काँग्रेसचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे यांचा प्रचार केला तरी त्यांचे चिरंजीव सिध्दार्थ मुरकुटे यांनी छुप्या पद्धतीने लोखंडे यांचा प्रचार केला. त्यामुळे लोखंडे यांच्या विजयाने राष्ट्रवादीला आनंदाच्या उकळ्या फुटत आहेत. सेना-भाजपला आनंद झाला आहे, त्यांच्याही विधानसभेच्या अपेक्षा उंचावल्या आहेत.
माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्या कमालपूर गावात वाकचौरे यांना अवघी ४० मते तर लोखंडे यांना ५०२ मते, अशोक सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांचे मतदान असलेल्या अशोकनगर येथे १ हजार २९७ मतांची आघाडी लोखंडे यांना आहे. त्यामुळे राष्ट्रवादीने नेमके काय केले. याचा बोध झाल्याखेरीज राहात नाही. राष्ट्रवादीचे राष्ट्रीय सरचिटणीस माजी खासदार गोविंदराव आदिक यांच्या कमालपूर गावात १८३ मतांनी सेनेचे लोखंडे यांना मताधिक्य आहे. श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाचा आमदार विखे ठरवतात, असे राजकीय अभ्यासक सांगत, पण विखेंच्या प्रभाव क्षेत्रातील कडीत खुर्द या गावात वाकचौरे यांना केवळ ३५ मतांची आघाडी मिळाली. विखे यांची जादू तालुक्यात सोडाच, पण त्यांच्या प्रभावक्षेत्रात चालली नाही.
काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जयंत ससाणे यांचा शहरावर प्रभाव आहे. या वेळी मुस्लीम मतदार काँग्रेस बरोबर होता. स्थानिक पातळीवर तो ससाणे यांच्याबरोबर आहे. सुभेदारवस्ती, फकीरवाडा तसेच शहरातील मुस्लीम बहुलभागात काँग्रेसचे उमेदवार वाकचौरे यांना साडेचार हजारांचे मताधिक्य मिळाले. पण नेहमीप्रमाणे हिंदू मते ससाणे यांच्या विरोधात गेली. सुमारे साडेआठ हजार मतांचे मताधिक्य लोखंडे यांना मिळाले. ससाणे यांना हा धक्का मानला जातो. ससाणे राहात असलेल्या प्रभागात तसेच त्यांच्या पत्नी नगराध्यक्षा राजश्री ससाणे यांच्या प्रभागातही लोखंडे यांना मोठे मताधिक्य मिळाले. स्वत:च्या मोहल्यातही ससाणे काँग्रेसला मताधिक्य मिळवून देऊ शकले नाही. त्यांच्या काही नगरसेवकांनी विरोधी काम केले. त्यात काही अल्पसंख्यांक नगरसेवकांचा समावेश होता. स्वत:चे नगरसेवक त्यांना सांभाळता आले नाही. आमदार भाऊसाहेब कांबळे यांचीही तीच गत आहे. कांबळे यांच्या घराशेजारी असलेल्या गोंधवणीच्या मतदान केंद्रावर तसेच भैरवनाथनगरला मोठे मताधिक्य आहे. मात्र काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सचिन गुजर यांचे गुजरवाडी, मुस्लीम बहुलमतदार असलेले जाफराबाद, एकलहरे येथे तसेच रामपूर, हरेगाव, खोकर, कडीत खुर्द या गावात काँग्रेसला मताधिक्य मिळाले.
विधानसभा मतदारसंघात राहरी तालुक्यातील ३२ गावे येतात. तेथे लोखंडे यांना १५ हजारांचे मताधिक्य मिळाले. तर श्रीरामपूर तालुक्याच्या ग्रामीण भागात २८ हजाराचे मताधिक्य मिळाले. एकूणच मोदी लाटेत नेत्याच्या प्रभावाचीही धूळधाण झाली.