विष प्राशन केल्याने उपचारासाठी दाखल केलेल्या एका महिलेचा जिवंतपणीच मृत्यू अहवाल पोलीस ठाण्यात पाठविण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार येथे घडला आहे. पोलिसांनीही कोणतीच खातरजमा न करता, ‘मर्ग डायरी’त मृत्यूची नोंद केली. स्थानिक दैनिकात आपल्या मृत्यूची बातमी वाचून हादरलेली ही महिला थेट पोलीस ठाण्यात पोहचली. त्यानंतर कागदोपत्री मृत असलेली बाई समोर उभी ठाकलेली पाहून पोलिसही अवाक झाले. आपली घोडचूक झाल्याचे मान्य करीत पोलिसांसह वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनानेही या महिलेला कागदोपत्री पूर्ववत जिवंत केले. यवतमाळच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात बुधवारी ही घटना घडली.

शहरालगतच्या मोठे वडगाव परिसरातील शांतीनगरात राहणाऱ्या उज्ज्वला राजेश वानखडे (वय २५) या महिलेने मंगळवारी ६ ऑक्टोबरला विषारी औषध प्राशन केले. ही बाब कुटुंबियांच्या लक्षात येताच तिला तत्काळ येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. एका महिला वैद्यकीय अधिकाऱ्याने विषबाधेचे प्रकरण असल्याने तिचा मृत्यूपूर्व जबाब नोंदविण्यासाठी ‘मेमो’ तयार करून तो नीलेश नामक वॉर्डबॉयच्या मार्फत अवधूतवाडी पोलीस ठाण्यात पाठविला, असे वैद्यकीय प्रशासनाने म्हटले आहे.

तर वैद्यकीय महाविद्यालयाकडून मृत्यूपूर्व जबाबाच्या मेमोएवेजी मृत्यू अहवाल मिळाला. त्यामुळे पोलिसांनी अपराध क्रमांक ५४/२०२० नुसार संबंधित महिलेचा ‘अकस्मात मृत्यू’ झाल्याची नोंद केली. वैद्यकीय महाविद्यालयाकडून संबंधित महिलेचा ‘डेथ मेमो’ आला होता. यासंदर्भात महाविद्यालयाशी संपर्क करून खातरजमा केली. मात्र, मर्ग डायरीत कोणतीही नोंद घेतली नव्हती. या प्रकरणात काहीही तथ्य नाही, अशी माहिती अवधूतवाडी ठाण्याचे पोलीस निरीक्षक आनंद वागतकर यांनी दिली.

विष अंगात भिनले नसल्याने आणि वेळेत उपचार मिळाल्याने अवघ्या काही तासातच ती ठणठणीत झाली व तिला रूग्णालयातून सुटीही मिळाली. दुसऱ्या दिवशी ७ ऑक्टोबरला स्थानिक दैनिकामध्ये आपल्या निधनाची बातमी वाचून उज्ज्वला यांना धक्काच बसला. त्यांनी तत्काळ पोलीस ठाणे गाठून जाब विचारला. पोलिसांनी त्यांना महाविद्यालयातून आलेला ‘मेमो’ दाखविला. त्यानंतर त्यांनी शासकीय रुग्णालय गाठून प्रशासनास धारेवर धरले. प्रशासनाने सुधारित पत्र तयार करून स्वत: मृत घोषित केलेल्या महिलेला पुन्हा कागदोपत्री जिवंत केले. त्यानंतर पोलिसांनीही चूक सुधारून रेकॉर्डवरील माहिती रद्द केली. सदर प्रकरणात वैद्यकीय महाविद्यालयाने आकस्मिक विभागास चौकशीची आदेश दिले आहे. हा अहवाल आल्यानंतर संबंधितांवर कारवाईसंदर्भात निर्णय घेतला जाईल, अशी प्रतिक्रिया अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे यांनी दिली.