शहरात उद्भवलेल्या करोना महामारीचा मुकाबला करताना अधिकारी-कर्मचारी अपुऱ्या संरक्षक साधनांसह जोखमीची अत्यावश्यक कामे करीत असतांना करोनापासून बचाव करण्यासाठी असलेले संरक्षक साधने त्यांना वाटप न करता तसेच गोदामात पडून असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. महापालिकेच्या भांडारपाल विभागाच्या या सावळ्या गोंधळामुळे शहरात संतप्त प्रतिक्रिया उमटली आहे.

दिवसागणिक बाधितांचा आकडा वाढत असल्याने मालेगाव करोनाचे ‘हॉटस्पॉट’ बनले आहे. या महामारीचा सामना करण्यासाठी महापालिकेतर्फे कर्मचारी, अधिकाऱ्यांसाठी पीपीई कीट, एन-९५ दर्जाचे मास्क, सॅनिटायझर, हॅन्ड ग्लोव्हज आदी संरक्षक साहित्य तसेच थर्मल डिटेक्टरसह अन्य रुग्णालयीन उपयोगाच्या सुमारे ७० लाखाच्या वस्तूंची खरेदी करण्यात आली आहे. महापालिकेच्या भांडार गृहात ठेवलेल्या या वस्तू आवश्यकतेप्रमाणे अधिकारी-कर्मचाऱ्यांना वितरण करण्याची भांडारपालाची जबाबदारी होती. परंतू, अनेकांना या वस्तूंचे वितरणच झाले नाही. त्यामुळे करोना उद्रेकाच्या आणीबाणीतील काळात अनेक अधिकारी-कर्मचाऱ्यांना अपुऱ्या संरक्षक साहित्यासह जोखमीची कामे करावी लागली. काहींना स्वत: या संरक्षक वस्तू खरेदी कराव्या लागल्या.

अधिकारी कर्मचाऱ्यांकडून यासंदर्भात प्रशासनाकडे तक्रारी करण्यात येत होत्या. मात्र, भांडारपाल विभागाकडून या वस्तूंचे नीटपणे वितरण केले जात असल्याचे ठासून सांगितले जात होते. त्यातच गेल्या पंधरा दिवसापासून भांडारपाल गायब झाला आहे. यासंदर्भात संशय आल्याने महापालिका आयुक्त दीपक कासार व उपायुक्त नितीन कापडणीस यांनी भांडारगृहाच्या गोदामात छापा टाकला असता बहुसंख्य वस्तूंचे वितरण झाले नसल्याचे व त्या वस्तू तशाच पडून असल्याचे निदर्शनास आले. या प्रकाराची गंभीर दखल घेऊन महापालिका प्रशासनाने भांडारपालाविरुध्द आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत पोलीसात गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू केली आहे. तर या विभागातील संबंधित एका कर्मचाऱ्याला चाळीस हजाराचा दंड आकारण्यात आला आहे.

एकीकडे अपुऱ्या संरक्षण साधनांच्या आधारे महापालिका अधिकारी-कर्मचारी धोका पत्करून काम करीत असताना दुसरीकडे अशा पद्धतीने संरक्षण साधने गोदामात पडून असल्याने महापालिकेचा सावळागोंधळ चव्हाट्यावर आला आहे. तसेच करोनासारख्या संकटकाळात दाखविल्या गेलेल्या या बेपर्वाईमुळे शहरात आश्चर्यही व्यक्त केली जात आहे.