21 April 2019

News Flash

धक्कादायक! : अवनी वाघीण आठवडाभरापासून होती उपाशी; दोन बछड्यांचाही भुकेने मृत्यूचा संशय

प्रयोगशाळेत वाघिणीच्या मुत्राचे नमुने, हृदयातील रक्ताचे नमुने, ज्या बंदुकीच्या गोळीने अवनी वाघिणीला ठार करण्यात आले त्या गोळीचे दोन तुकडे, हाडं आणि स्नायू तसेच गोळीमुळे तुटलेल्या

प्रतिकात्मक छायाचित्र

ठार करण्यात आलेल्या नरभक्षक अवनी वाघिणीचा शवविच्छेदन अहवाल जाहीर करण्यात आला आहे. मात्र, या अहवालातून एक धक्कादायक बाब समोर आली आहे ती म्हणजे अवनी आठवडाभर उपाशी होती. दरम्यान, तिच्या दोन बछड्यांचा सध्या वनखात्याचे कर्मचारी अद्यापही शोध घेत आहेत. मात्र, त्यांचाही कदाचित भुकेने मृत्यू झाला असण्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

वाघिणीला ज्या ठिकाणी ठार करण्यात आले त्या ठिकाणच्या वाघिणीच्या त्वचेचे आणि स्नायूंचे सॅम्पल नागपूरमधील विभागीय न्यायवैद्यक प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आले होते. यावेळी अवनीच्या डाव्या मांडीच्या स्नायूंची चाचणी करण्यात आली. यामध्ये वाघिणीला ठार करण्यापूर्वी तिला बेशुद्धीच्या औषधाची सुई टोचण्यात आली होती की नाही याची तपासणी करण्यात आली. प्रयोगशाळेत वाघिणीच्या मुत्राचे नमुने, हृदयातील रक्ताचे नमुने, ज्या बंदुकीच्या गोळीने अवनी वाघिणीला ठार करण्यात आले त्या गोळीचे दोन तुकडे, हाडं आणि स्नायू तसेच गोळीमुळे तुटलेल्या बरगड्यांचे नमुने तपासण्यात आले.

यवतमाळच्या पांढरकवडा भागात असलेल्या अवनी या टी१ वाघिणीला शुक्रवारी रात्री गोळी घालून ठार करण्यात आले. त्यानंतर राज्यासह देशभरात संतापाची लाट निर्माण झाली. प्राणी प्रेमींकडून राज्य शासनाच्या या कृत्याचा निषेध करण्यात आला. त्यावर वाघिणीला मारणे कसे गरजेचे होते यावर अनेकदा स्पष्टीकरणेही देण्यात आली. केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांनी याप्रकरणी तीव्र प्रतिक्रिया देत राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. तसेच अवनीला ठार करणाऱ्या असगर अली या शिकाऱ्याचे वडिल शाफत अली खान यांच्यावर गुन्हेगार आणि वाघिणीचे मारेकरी असा उल्लेख केला होता. त्यावर शाफत अली खान यांनी मनेका गांधींविरोधात कायदेशीर कारवाई करणार असल्याचे म्हटले आहे.

त्याचबरोबर, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील अवनी वाघिणीला ठार करण्यावर नाराजी व्यक्त करीत सरकारवर निशाणा साधला होता. यवतमाळमधील अनिल अंबानी यांचा प्रस्तावित प्रकल्प वाचवण्यासाठी या वाघिणीला ठार करण्यात आल्याचा गंभीर आरोप राज यांनी केला होता. मात्र, याला उत्तर देताना अनिल अंबानींच्या प्रवक्त्याने सांगितले की, अंबानींचा कोणताही प्रकल्प यवतमाळ येथे नाही.

First Published on November 8, 2018 9:34 pm

Web Title: shocking news avni tigress was hungry since the week and suspect that her cubs must also be starving to death