News Flash

जीवरक्षक प्रणाली वापराविना?

फटका जिल्ह्यातील गरजू रुग्णांना बसत असून रुग्णांना मुंबई- वापी येतील रुग्णालयांचा आसरा घ्यावा लागत आहे.

जीवरक्षक प्रणाली स्थिती

नीरज राऊत

पालघर जिल्ह्यतील धक्कादायक प्रकार; प्रशिक्षित मनुष्यबळ, प्राणवायू यांच्या कमतरतेमुळे पेच

पालघर : करोना संसर्गाच्या लाटेत अत्यवस्थ होणाऱ्या रुग्णांना जीवरक्षक प्रणाली (व्हेंटिलेटर) असलेल्या खाटा वेळेत न मिळाल्याने अनेक मृत्यू होत असताना पालघर जिल्ह्यात २९ व्हेंटिलेटर यंत्रणा धूळ खात पडून असल्याचे आढळून आले आहे. पालघर जिल्ह्याने आपल्याकडे असलेले २० व्हेंटिलेटर जिल्ह्याबाहेर वापरण्यासाठी दिले असून इतर २९ व्हेंटिलेटर प्रशिक्षित मनुष्यबळ, प्राणवायूची कमतरता व इतर कारणांमुळे धूळ खात पडल्याचे दिसून येत आहे.  याचा फटका जिल्ह्यातील गरजू रुग्णांना बसत असून रुग्णांना मुंबई- वापी येतील रुग्णालयांचा आसरा घ्यावा लागत आहे.

करोनाच्या पहिल्या लाटेत जिल्ह्याकडे ११० व्हेंटिलेटर उपलब्ध होते. मात्र ‘इन्टेन्सिव्हिस्ट’ तज्ज्ञांची जिल्ह्यात कमतरता असल्याने बहुतांश जीवरक्षक प्रणालीचा वापर पूर्ण क्षमतेने होऊ शकला नव्हता. करोनाची दुसरी लाट सुरू झाल्यानंतर पालघर जिल्ह्याकडे पडून राहिलेल्या व्हेंटिलेटरपैकी कल्याण डोंबिवली महानगरपालिका तसेच अंबरनाथ येथे २० व्हेंटिलेटर मदत रूपाने देण्यात आले आहेत. उर्वरित ९० पैकी ७३ व्हेंटिलेटर शासकीय आरोग्य केंद्रांमध्ये कार्यरत असून जिल्ह्यातील खासगी समर्पित करोना रुग्णालयांमध्ये १७ व्हेंटिलेटर दिल्याची माहिती शल्य चिकित्सक विभागाकडून प्राप्त झाली आहे. याखेरीज जिल्ह्यातील ग्रामीण भागातील विविध खासगी रुग्णालयांमध्ये स्वत:चे सहा व्हेंटिलेटर असल्याचे सांगण्यात येत आहे.

वसई- विरार महानगरपालिका क्षेत्र वगळून जिल्ह्याच्या उर्वरित ग्रामीण भागात सध्या ६७ व्हेंटिलेटर खाटा उपलब्ध असल्याचे करोना डॅशबोर्डवरून निदर्शनास येत आहे. त्यापैकी रिव्हरा रुग्णालयात ४०, टिमा रुग्णालयात सहा तर वेदान्त रुग्णालयात पाच असे एकंदर ५१ व्हेंटिलेटर शासकीय आरोग्य व्यवस्थेत तर सोळा व्हेंटिलेटर खासगी करोना रुग्णालयांमध्ये उपलब्ध आहेत.

यावरून शासकीय आरोग्य व्यवस्थित असलेले २२ तर खासगी रुग्णालयांकडे असलेले सात व्हेंटिलेटर वापर होत नसल्याचे शासकीय आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. एकीकडे अतिदक्षता विभाग व व्हेंटिलेटरच्या मागणीमुळे रुग्णांची कुचंबणा होत असताना जिल्ह्याकडे उपलब्ध असणाऱ्या व्हेंटिलेटरचा वापर होत नसल्याने शासकीय व्यवस्थेमधील अकार्यक्षमता दर्शवीत आहे.

जिल्ह्याच्या ग्रामीण भागात ३० ते ४० लाख लोकसंख्या असताना जिल्ह्यात शासकीय आरोग्य विभागाकडे व्हेंटिलेटर वापरण्यासाठी प्रशिक्षित वैद्यकीय तज्ज्ञ पुरेशा प्रमाणात नसल्याचे सांगण्यात येते. त्याचबरोबरीने व्हेंटिलेटरच्या वापरासाठी आवश्यक असणाऱ्या प्राणवायूचा पुरेशा दाबाने पुरवठा व आवश्यक प्रमाणात समर्पित मनुष्यबळ नसल्याने जिल्ह्यावर ही नामुष्की ओढवली आहे.

याविषयी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजेंद्र केळकर यांच्याशी संपर्क साधला असता जिल्ह्यात उपलब्ध असणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मदतीने व्हेंटिलेटरचा वापर करण्यात येत असल्याचे त्यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 5, 2021 12:26 am

Web Title: shocking palghar district patch trained manpower oxygen ssh 93
Next Stories
1 बंद पडलेल्या खासगी जम्बो हॉस्पिटलमधील खाटा कोविड रुग्णालयात
2 शहरातील स्मशानाची संख्या पालिकेने वाढविली
3 नोंदणी आणि लसीकरण एकाच दिवशी
Just Now!
X