यशवंतराव मोहिते कृष्णा साखर कारखान्याच्या निवडणुकीत धक्कादायक निकालाची परंपरा सभासदांनी कायम राखली असून, सलग तिसऱ्या निवडणुकीत सत्तांतर घडवताना, आपल्या मतांचा करिष्मा दाखवून दिला आहे. काल मंगळवारी झालेल्या मतमोजणीत अगदी अखेरच्या मतापर्यंत सत्तासंघर्ष ताणला जाताना प्रथमच संमिश्र संचालक मंडळ निवडून आले आहे. डॉ. सुरेश भोसले यांच्या सहकार पॅनेलला सभासदांनी विजयाचा गुलाल दिला असला तरी संचालक मंडळात विरोधी सहा संचालकांना संधी मिळाल्याने ‘कृष्णा’च्या संचालक मंडळाची प्रत्येक बैठक आता लक्ष्यवेधी ठरणार आहे.
दरम्यान, अविनाश मोहिते यांना राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा राहिल्याचा बोलबाला असून, माजी मंत्री जयंत पाटील यांच्या नेमक्या भूमिकेबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत.  कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे २१ जणांचे संचालक मंडळ निवडण्यासाठी रविवारी (दि. २१) भरपावसात चुरशीने ८०.७३ टक्क्यांवर मतदान झाले. काल मतमोजणीवेळी अटीतटीच्या तिरंगी लढतीत अखेरच्या मतापर्यंत उत्कंठा राहिली. त्यात माजी मंत्री विलासकाका उंडाळकर यांचे मार्गदर्शन लाभलेल्या डॉ. सुरेश भोसले यांच्या नेतृत्वाखालील जयवंतराव भोसले सहकार पॅनेलचे १५ उमेदवार विजयी झाले. तर सत्ताधारी संस्थापक पॅनेलचे ६ उमेदवार जिंकले असून, काँग्रेस नेत्यांचा कृपाशीर्वाद लाभलेले यशवंतराव मोहिते रयत पॅनेलचा दारुण पराभव झाला. डॉ. पतंगराव कदम व पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रत्यक्ष प्रचारात उतरताना, आपली प्रतिष्ठा पणाला लावली होती. पण, मोठय़ा फरकाने रयत पॅनेल हरले असल्याने काँग्रेसच्या विचाराला अन् उभय काँग्रेस नेत्यांना सभासदांनी झिडकारले असल्याचे मानले जात आहे.
मतमोजणीच्या प्रारंभी अनुसूचित जाती-जमाती, इतर मागासवर्ग व महिला राखीव मतदारसंघातील उमेदवारांना विजयासाठी झगडावे लागले. या पाच जागांत सहकार पॅनेलला तीन तर, संस्थापक पॅनेलला दोन जागा अल्प मताधिक्याने मिळाल्याने सर्वसाधारण गटातील मतमोजणीची उमेदवारांसह त्यांच्या हजारो समर्थकांना अस्वस्थ करणारी होती. सरते शेवटी सहकार पॅनेलची आघाडी कायम राहून त्यांना १५ जागा, तर संस्थापक पॅनेलला ६ जागा मिळाल्या. कारखान्याचे माजी अध्यक्ष मदनराव मोहिते व त्यांचे चुलतबंधू डॉ. इंद्रजित मोहिते यांच्या रयत पॅनेलच्या हाती सभासदांनी भोपळा दिला. येथील स्थानिक लोकप्रतिनिधी व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि डॉ. पतंगराव कदम यांनी जाहीर सभा घेऊन रयत पॅनेलला मतदान करण्याचे आवाहन करताना, विजयाचा ठाम दावा केला होता. पण, कृष्णा सभासदांनी या मातबर नेत्यांच्या आवाहनाला वाटाण्याच्या अक्षता लावताना मोहिते बंधूंच्या पॅनेलचा नामुष्कीजनक पराभव केला. परिणामी, काँग्रेस पक्षालाच जबर धक्का बसला असून, आगामी कराड बाजार समिती व कराड नगरपालिकेसह सर्वच निवडणुकांत नव्या राजकीय समीकरणांचे पडसाद उमटणार आहेत. विलासकाका उंडाळकर यांनी पाठबळ दिलेले सुरेश भोसलेंचे संचालक मंडळ ‘कृष्णा’च्या सत्तेत आल्याने अन् पृथ्वीराज चव्हाणांच्या पाठिंब्यावरील रयत पॅनेल फरकाने पराभूत झाल्याने काँग्रेस हरली अन् बंडखोर काँग्रेस जिंकल्याचे म्हणावे लागत आहे.
अविनाश मोहिते एकाकी झुंज देत असताना, त्यांच्या उमेदवारांचा अगदी थोडय़ा मतांनी पराभव झाल्याने संस्थापक पॅनेलचाच नैतिक विजय असल्याचा दावा त्यांच्या समर्थकांकडून केला जात आहे. दरम्यान, मतमोजणीत काळेबेरे झाल्याचा संशय व्यक्त करताना, संस्थापक पॅनेलचे प्रमुख प्रशांत पवार व अशोकराव थोरात यांनी फेर मतमोजणीसाठी न्यायालयात दाद मागणार असल्याचे जाहीर केले आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी फेर मतमोजणीचा अर्ज फेटाळल्याने संस्थापक पॅनेलमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. संस्थापक पॅनेलच्या ७ उमेदवारांचा अगदी दोन आकडय़ांत पराभव होताना अवैध मतांची संख्या सातशेहून अधिक असल्याचे सांगण्यात आले.
सहकार पॅनेलचे विजयी १५ उमेदवार असे- डॉ. सुरेश भोसले, धोंडिराम जाधव, जगदीश जगताप, निवासराव थोरात, दयाराम पाटील, गुणवंतराव पाटील, लिंबाजी पाटील, गिरीश पाटील, जितेंद्र पाटील, संजय पाटील, सुजित मोरे, ब्रीजराज मोहिते, जयश्री पाटील, अमोल गुरव, पांडुरंग होनमाने. संस्थापक पॅनेलचे विजयी उमेदवार असे-अविनाश मोहिते, अशोकराव जगताप, पांडुरंग मोहिते, शिवाजी आवळे, सुभाषराव पाटील व उमा देसाई.

Mallikarjun Kharge criticizes Dalit oppression in Narendra Modi Maharashtra state
मोदींच्या राज्यात दलितांवर अत्याचार; मल्लिकार्जुन खरगे यांची टीका
eknath shinde devendra fadnavis
महायुतीत वादाची ठिणगी? भाजपा आमदार शिंदे गटातील खासदारावर टीका करत म्हणाले, “भ्रष्टाचाऱ्यांना…”
Gadchiroli, Congress
गडचिरोली : घटक पक्षातील नाराजी व जातीय समिकरणाचे काँग्रेसपुढे आव्हान !
Complaint against Fadnavis
फडणवीस व भाजप उमेदवार राम सातपुतेंविरुद्ध आचार संहिता भंग केल्याची तक्रार, मोची समाजाला प्रलोभन दाखविण्याचा आरोप