धवल कुलकर्णी

पर्यटकांमध्ये प्रसिद्ध असलेली वाघीण ‘शर्मिली’ हीच्या मृत्यूच्या तपासामध्ये एक धक्कादायक खुलासा झाला आहे. मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र या दोन राज्यांच्या सीमेवरील पेंच अभयारण्यात अधिवास असलेल्या शर्मिलीचा मृत्यू डिसेंबर २०१९ मध्ये झाला होता. या वाघिणीच्या मृत्यूच्या चौकशीदरम्यान मध्य प्रदेशच्या वन खात्याच्या अधिकाऱ्यांनी महाराष्ट्राच्या वन खात्याच्या धामसिंह खंडाते नामक एका कामगाराला ताब्यात घेतले आहे.

चौकशीमध्ये या वाघिणीचा मृत्यू नागपूरजवळील देवलापार परिसरात झाला असून तिचे शव महाराष्ट्राच्या वनखात्याच्या काही कर्मचाऱ्यांनी बैलगाडीत घालून मध्य प्रदेशातील खवासा वनपरिक्षेत्रात फेकल्याचा संशय आहे. या घटनेमध्ये महाराष्ट्राच्या वन खात्याचा एक ड्युटी रेंजर जबाबदार असल्याचा संशय आहे.

याबाबत लोकसत्ता डॉटकॉमला माहिती देताना नागपूर वन विभागाचे उप वन संरक्षक प्रभुनाथ शुक्ला यांनी सांगितले की, “आम्ही याबाबत मध्य प्रदेश वन खात्याच्या अधिकाऱ्यांसोबत संपर्क साधला असून तपासासंबंधातली कागदपत्रं मागवली आहेत. खंदाते हा प्लांटेशन विभागात रोजंदारी कामगार असल्याचेही त्यांनी मान्य केले आहे. मात्र, याबाबत आम्हाला मध्य प्रदेशच्या वन खात्याकडून अद्याप अधिकृतरित्या कुठलीही माहिती मिळालेली नाही. या तपासासाठी आम्ही मध्य प्रदेशच्या वन खात्यातील कर्मचार्‍यांना मदत करायला तयार आहोत.”

मृत शर्मिला वाघिणीचे वन खात्याने ठेवलेले नाव T-19 असे असून तीचे महाराष्ट्र-मध्य प्रदेश सीमावर्ती भागामध्ये वास्तव्य होते. याबाबत माहिती देताना वन खात्याच्या एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने ही घटना आमच्यासाठी धक्कादायक असल्याचे सांगितले. मागच्या वर्षी साधारणपणे तीन ते चार महिने वाघाचा इथल्या काही गावांच्या अवतीभोवती वास्तव्य होते. त्यावेळी स्थानिक गावकऱ्यांचा संघर्ष होऊ नये म्हणून वन खात्याच्या कर्मचार्‍यांनी खूप चांगले काम केले होते.

मात्र, वाघाचा मृत्यू झाल्यावर होणारा प्रचंड आरडाओरडा आणि स्थानिक अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याबाबत होत असलेल्या मागण्यांमुळे कदाचीत या अधिकाऱ्याने घाबरून असे टोकाचे पाऊल उचलले असावे असे ते म्हणाले. पण वाघाचा मृत्यू झाला असेल तर त्याची चौकशी व्हायलाच पाहिजे, अशा गोष्टी पुन्हा घडू नयेत अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.