News Flash

प्रवाशांच्या पावलांवरील भिरभिरती नजर रोजगाराच्या शोधात

रेल्वेस्थानकांतील बूटपॉलिशवाल्यांवर करोनाकाळात उपासमारीची वेळ

रेल्वेस्थानकांतील बूटपॉलिशवाल्यांवर करोनाकाळात उपासमारीची वेळ

विरार : रेल्वे स्थानकांतील फलाटांवरील खांबांना पाठ टेकून बसलेल्या निळ्या वेशातील बूटपॉलिशवाल्यांची प्रवाशांच्या धावत्या-चालत्या पावलांकडे लागलेली भिरभिरती नजर सध्या एक वेळच्या पोटाची ददात मिटेल का, याकडे लागलेली आहे.

करोनाची लागण भारतात सुरू झाल्याची घोषणा मार्चअखेरीस झाली आणि काही तासांत रेल्वेस्थानकांवरील या कर्मचाऱ्याची जागा सुटली. त्यानंतर या क्षणापर्यंत ती त्याला मिळालेली नाही आणि येत्या काळात ती कधी मिळेल याची कोणतीही हमी रेल्वे प्रशासन वा केंद्र सरकारने दिलेली नाही. त्यामुळे करोनाकाळातील आर्थिक संकटावर मात करण्यासाठी बूटपॉलिशवाले अन्य कामांसाठी अन्यत्र वणवण फिरत आहेत. सध्या अत्यावश्यक सेवेसाठी उपनगरी गाडय़ा पश्चिम, मध्य आणि हार्बर मार्गावर धावत आहेत. मात्र बूटपाॉलिशवाल्यांना स्थानकात बसण्याची परवानगी देण्यात आलेली नाही.

पश्चिम रेल्वेवरील विरार ते चर्चगेट स्थानकादरम्यानच्या फलाटांवर एकूण ३९१ बूटपॉलिशवाले बसतात. सदोदित गर्दीने फुललेल्या स्थानकांवर काही ग्राहकांसाठी सेवा तर हमखास घडायची आणि दिवसाच्या पोटापाण्याचा प्रश्न सुटायचा. गेली २० ते २५ वर्षे हे कायम होते. परंतु मार्चनंतर अनेकांच्या हातचा रोजगारच गेला आणि आम्ही उघडय़ावर आलो, अशी प्रतिक्रिया एका बूटपॉलिशवाल्याने दिली.

गेली कित्येक वर्षे आम्हाला एकाच कामाची सवय झालीय. आता दुसरे काम हाताला जरी मिळाले तरी त्यातील कौशल्य मिळविण्यासाठी काही काळ जाणारच आहे. त्यामुळे कोणी लगेच काम देण्यास धजावत नाही आणि करोनाकाळात तर अनेकांचे व्यवसाय ठप्प झाले. त्यामुळे दुसरीकडेही काम शिल्लक नाही, असे एक जण ‘लोकसत्ता’शी बोलताना म्हणाला.

रेल्वेस्थानक सुटल्यानंतर उरलीसुरली पुंजी खिशात राखून अनेकांनी गावचा रस्ता धरला. कुटुंबाचा खर्च चालवणे कठीण झाले. त्यामुळे काहींनी रोजंदारीवर काम करणे सुरू केले.

आम्ही संस्थेच्या माध्यमातून अनेक वर्षांपासून व्यवसाय करीत होतो. परंतु करोनाकाळात आमच्या सर्वाचे व्यवसाय गेले. केंद्र सरकारकडून बूटपॉलिशवाल्यांना आधार दिला गेला नाही. अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. केंद्राने आमच्या पोटापाण्याचा विचार करावा.

– राम किसान मेहरा, अध्यक्ष महाराष्ट्र बूटपॉलिश संघटना

बूटपॉलिशवाल्यांना स्थानकात येण्यास मनाई केलेली नाही. ते येथे येऊन व्यवसाय करू  शकतात. त्यांनी नियमांची काळजी घ्यावी.

– रवींद्र भाकर, मुख्य जनसंपर्क अधिकारी पश्चिम रेल्वे रेल्वे 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 8, 2020 12:41 am

Web Title: shoe polishers on railway stations face financial crisis during corona period zws 70
Next Stories
1 ‘केवायसी’च्या नावाखाली प्राध्यापकास ४६ लाखांचा गंडा
2 जिल्ह्य़ात खरीप हंगामात १०४ टक्के पेरण्या
3 परिवहन ठेका अखेर रद्द
Just Now!
X