News Flash

सोलापूरच्या शिक्षकाला सात कोटींचा जागतिक पुरस्कार

जगभरातील १४० देशांतील १२ हजारांपेक्षा अधिक शिक्षकांनी या पुरस्कारांसाठी प्रस्ताव सादर केले होते

सोलापूर : युनेस्को आणि लंडनस्थित ‘वार्की फाऊंडेशन’ यांच्या संयुक्त विद्यमाने दिल्या जाणाऱ्या ‘ग्लोबल टीचर पुरस्कारा’साठी सोलापूरमधील परितेवाडीतील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक  रणजितसिंह डिसले यांची निवड झाली. तब्बल सात कोटी रुपयांचा (एक दशलक्ष अमेरिकी डॉलर) हा पुरस्कार असून ते मिळवणारे डिसले हे पहिलेच भारतीय शिक्षक ठरले आहेत.

लंडनमधील ‘नॅचरल हिस्ट्री म्युझियम’मध्ये गुरुवारी झालेल्या एका कार्यक्रमात सुप्रसिद्ध अभिनेते स्टीव्हन फ्राय यांनी या पुरस्काराची अधिकृत घोषणा केली. जगभरातील १४० देशांतील १२ हजारांपेक्षा अधिक शिक्षकांनी या पुरस्कारांसाठी प्रस्ताव सादर केले होते. त्यातून प्राथमिक फेरीसाठी पन्नास, तर अंतिम फेरीसाठी डिसले यांच्यासह  इटली, ब्राझिल, व्हिएतनाम, मलेशिया, नायजेरिया, दक्षिण आफ्रिका, दक्षिण कोरिया, अमेरिका आणि ब्रिटनमधील दहा शिक्षकांना नामांकने जाहीर झाली होती.

निम्मी रक्कम इतर स्पर्धकांना..

डिसले यांनी पुरस्काराच्या एकूण रकमेपैकी ५० टक्के रक्कम या पुरस्कारासाठी अंतिम फेरीत पोहोचलेल्या अन्य नऊ  शिक्षकांना देण्याचे जाहीर केले . यामुळे या नऊ  देशांतील हजारो शालेय विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळण्यासाठी मदत होईल, असा आशावाद डिसले यांनी व्यक्त केला, तर उर्वरित रक्कम ‘टीचर इनोव्हेशन फंड’साठी वापरणार असून त्यामुळे शिक्षकांमधील नवोपक्रमशीलतेला चालना मिळेल, असेही त्यांनी नमूद केले. पुरस्काराच्या इतिहासात एखाद्या विजेत्याने मिळालेल्या पुरस्काराची काही रक्कम अंतिम फेरीतील अन्य मानांकितांना देण्याची ही पहिलीच वेळ आहे.

निवड का?

’डिसले यांनी शालेय अभ्यासक्रमांच्या पुस्तकांना ‘क्यूआर कोड’ची जोड देऊन शिक्षणात ‘डिजिटल क्रांती’ करण्याचा प्रयोग केला.

’या प्रयोगाने केवळ महाराष्ट्राच्याच नाही, तर देशाच्या शिक्षण क्षेत्रात क्रांती झाली. तब्बल ८३ देशांतील विद्यार्थ्यांना ते ऑनलाइन माध्यमाद्वारे विज्ञान शिकवतात.

’त्याचबरोबर अस्थिर राष्ट्रांतील विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे कार्य करतात.

लहानपणी आई-वडिलांसह शिक्षकांकडून मिळालेले संस्कार, प्रामाणिकपणे नवनवीन शिकण्याची प्रेरणा, शिक्षक म्हणून मुलांना घडविताना वरिष्ठांनी सतत दिलेले प्रोत्साहन, यामुळे मिळालेली प्रेरणा यातूनच हा गौरव प्राप्त करू शकलो. जागतिक स्तरावर जाहीर झालेला पुरस्कार के वळ माझा नसून संपूर्ण देशाचा आहे. समस्त शिक्षकवर्गाचा हा बहुमान आहे.

रणजितसिंह डिसले

ग्रामीण भागातील मुलींच्या शिक्षणासाठी डिसले यांनी प्रयत्न केले. त्यामुळे त्यांची शाळेतून गळती थांबली आणि बालविवाहाला आळा बसला.  – वार्की फाऊंडेशन

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 4, 2020 3:21 am

Web Title: sholapur schoolteacher wins seven crore global teacher prize zws 70
Next Stories
1 दहा दिवसांत विद्यार्थ्यांची उपस्थिती जवळपास दुप्पट
2 देशातील दहा उत्कृष्ट पोलीस ठाण्यांमध्ये राज्यातील सर्वच अपात्र
3 वीजदेयकांची थकबाकी हप्त्याने भरण्याची योजना
Just Now!
X