राज्य सरकारने अधिसूचना काढल्याशिवाय कोणीही अशा प्रकारच्या आस्थापना, दुकाने सुरू करू नयेत, असे आवाहन आज कोल्हापूरचे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी केले.

करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लाॅकडउन सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शहरी आणि ग्रामीण भागात काही दुकाने, आस्थापना सुरू करण्यास केंद्र सरकारने परवानगी दिल्याचे वृत्त अनेक ठिकाणी प्रसारित झाले आहे.   मात्र, असं जरी असलं तरी देखील राज्य सरकार अशा प्रकारची अधिसूचना काढत नाही, तोपर्यंत संचार बंदीच्या काळात सुरू असलेले नियम तसेच राहतील. याची सर्व संबंधितांनी नोंद घेऊन लाॅकडाउनला सहकार्य करावे,असे आवाहनही त्यांनी केले आहे.

करोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाउन जाहीर करण्यात आलं आहे. यामुळे देशभरात दुकानं, मॉल्स बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले होते. परंतु शुक्रवारी रात्री उशिरा केंद्रीय गृहमंत्रालयानं मोठा निर्णय घेतला होता. केंद्रीय गृहमंत्रालयानं शनिवारपासून देशभरातील दुकानं उघडण्याची सशर्त परवानगी दिली होती. परंतु कोणती दुकानं उघडी ठेवावीत, कोणती नाही याबाबत मात्र सर्वांच्या मनात संभ्रम निर्माण झाला होता. त्यावर शनिवारी सकाळी केंद्र सरकारकडून स्पष्टीकरण देण्यात आलं.