जिल्ह्यातील करोनाग्रस्तांची वाढती संख्या लक्षात घेता जळगाव, पाचोरा, भुसावळ, अमळनेर, चोपडा या शहरातील जीवनावश्यक वस्तुंची दुकाने वगळता इतर व्यवहार रविवारपासून टाळेबंदी संपेपर्यंत बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी दिली.

जिल्हास्तरीय समितीची बैठक शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयात डॉ. ढाकणे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. बैठकीस पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, महापालिका आयुक्त सतीश कुलकर्णी, अप्पर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण आदी उपस्थित होते.

बाधित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचे कोविड केअर केंद्रात नमुने घेण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे आज जरी रुग्ण वाढत असले तरी भविष्यातील धोका यामुळे कमी होणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. जिल्ह्यातील प्रतिबंधित क्षेत्रातील कोणाही व्यक्तीला त्या क्षेत्राबाहेर जाता अथवा येता येणार नाही. प्रतिबंधित क्षेत्रातील ज्यांना उच्च रक्तदाब, मधुमेह आणि इतर आजार असतील त्यांच्या तपासणीसाठी, औषधांसाठी नियंत्रण अधिकारी सुचनेनुसार वाहन व्यवस्था करतील. महानगरपालिका क्षेत्रातील दवाखान्यांना आवश्यक बाबींसाठी आयुक्त सतीश कुलकर्णी तर ग्रामीण रुग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केद्रांसाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी.एन. पाटील हे नियंत्रक अधिकारी राहतील. प्रत्येक कोविड केअर सेंटरला आयुर्वेदिक डॉक्टरांची नेमणूक करण्याची सुचनाही जिल्हाधिकारी यांनी सर्व संबंधितांना दिल्या.

शैक्षणिक कारणासाठी जळगाव जिल्ह्यात पुण्याचे जे विद्यर्थी अडकलेले असतील त्यांची जाण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. यासाठी फक्त विद्यार्थ्यांंनीच प्रांताधिकारी दीपमाला चौरे (९९२३५६७४४९),उपजिल्हाधिकारी किरण सावंत (७५८८५९१८४६) या क्रमांकावर आपले नाव, शिक्षण संस्थेचे नाव आणि जाण्याचे ठिकाण याबाबतचा संदेश पाठवावा. बिहार आणि पश्चिम बंगालसाठी रेल्वेचे नियोजन करण्यात येत असल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी बैठकीत सांगितले.