पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या नावे सुरू केलेल्या अटल पेन्शन योजनेला नगण्य प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे. या तुलनेत याच योजनेबरोबर लोकार्पण झालेल्या दोन विमा योजनांना तुलनेने बरा प्रतिसाद आहे. दोन्ही विमा योजनांचे मिळून दीड महिन्यात सुमारे पावणेदोन लाख विमाधारक झाले आहेत.
पंतप्रधान मोदी यांनी ९ मे रोजी कोलकाता येथून देशभरात एकदाच दोन विमा योजना आणि पेन्शन योजना देशवासीयांना अर्पण केली. प्रायोगिक तत्त्वावरील या योजनेत नांदेडसह महाराष्ट्रातील १२ जिल्ह्य़ांचा समावेश आहे. मात्र, दीड महिन्यांनंतर नांदेडमध्ये दोन्ही विमा योजनांत मिळून केवळ पावणेदोन लाख लोकांनीच सुरक्षा कवच घेतले. तुलनेत अटल पेन्शन योजनेला अत्यल्प प्रतिसाद दिसून येतो.
यापूर्वी आघाडी सरकारने अल्प व अत्यल्प भूधारकांसाठी आम आदमी विमा योजना लागू केली; परंतु प्रशासकीय पातळीवरील उदासीनतेने या योजनेचेही लाभार्थी तुलनेने फारच कमी आहेत. आता मोदी सरकारने सर्वच क्षेत्रातील गोरगरीब व कष्टकऱ्यांसाठी जीवनज्योती व सुरक्षा विमा योजना लागू केल्या आहेत. लोकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने केंद्राचा हा महत्त्वाकांक्षी उपक्रम सर्वत्र गौरविला गेला.
प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेसाठी १८ ते ७० वर्षे वयोगटातील व्यक्ती पात्र असून, त्यांच्या बँक खात्यातून वार्षिक केवळ १२ रुपये वळते करून घेतले जाणार आहेत. या योजनेत लाभार्थ्यांला दोन लाख रुपयांचे अपघाती विमा सुरक्षा कवच असेल. जीवनज्योती योजनेसाठी १८ ते ५० वर्षे वयोगटातील व्यक्ती पात्र असून, आयुष्यभरासाठी २ लाख रुपयांचे विमा कवच असेल. कोणत्याही कारणाने मृत्यू झाल्यास संबंधिताच्या वारसाला या योजनेचा लाभ होईल. त्यासाठी ३३० रुपयांचा वार्षिक हप्ता असणार असून या योजनेतही बँक खात्यातून रक्कम परस्पर वळती करून घेतली जाणार आहे.
श्रमिक वर्गासाठी अटल पेन्शन योजना सुरू केली; परंतु या योजनेत संबंधित व्यक्तीला २० वर्षे ठराविक रक्कम नियमित भरावी लागणार आहे. त्यानंतर संबंधित व्यक्ती ६० वर्षांची झाल्यानंतर त्याला दरमहा ठराविक रकमेची पेन्शन लागू होईल. यात लाभार्थ्यांने भरलेल्या ५० टक्के रक्कम सरकार स्वत: जमा करणार आहे. परंतु योजनेत दरवर्षी आणि तेही २० वर्षांपर्यंत ठराविक रक्कम भरावयाची असल्याने अल्प प्रतिसाद आहे.
नांदेड जिल्ह्य़ात प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेचे आजवर १ लाख ४४ हजार २५३ विमाधारक झाले आहेत. जीवनज्योती योजनेचे ३१ हजार ६५१ विमाधारक आहेत. जनधन योजनेंतर्गत आजवर तब्बल ११ लाख ७९ हजार ९३६ बँक खाती उघडण्यात आली.