विभागात कर्मचाऱ्यांचा तुटवडा; सेवा देण्यात अडचणी

निखील मेस्त्री, लोकसत्ता

पालघर : करोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना जिल्ह्याच्या ग्रामीण भागात झपाटय़ाने वाढणाऱ्या रुग्णांवर उपचार करणे कर्मचाऱ्यांच्या तुटवडय़ामुळे कठीण जात आहे.  उपचारासाठी जिल्ह्यातील खासगी डॉक्टरांना सामावून घेण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला असला तरी वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, मदतनीस व सफाई कामगारांची कमतरता उपचाराच्या वेळी जाणवत आहे.  त्यामुळे रुग्णांचे हाल होत आहेत.

जिल्ह्यातील आरोग्य विभाग करोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी युद्धपातळीवर काम करीत आहे, परंतु कर्मचाऱ्यांची कमतरता असल्यानेआरोग्य केंद्रांमध्ये सद्य:स्थितीत असलेल्या अधिकारी- कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त ताण येत आहे.  जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सध्या १३ करोना उपचार केंद्रे सुरू आहेत. या केंद्रांवर १२९ डॉक्टरांची आवश्यकता आहे. मात्र नव्याने करण्यात आलेल्या भरती प्रक्रियेत फक्त एकच अर्ज प्राप्त झाल्याने इतर सर्व तज्ज्ञ डॉक्टरांची पदे रिक्त राहिली आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनाला खासगी डॉक्टरांच्या सेवा अधिग्रहित कराव्या लागल्या आहेत.

जून महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात शल्यचिकित्सक कार्यालयांतर्गत ११ प्रकारच्या पदांसाठी ७९९ पदे भरण्यासाठी अर्ज मागविण्यात आले होते. या प्रयत्नात फक्त १०७९ इच्छुकांनी प्रतिसाद दिला असून १९८ पात्र ठरलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना करोना उपचार केंद्रांमध्ये सेवा देण्यासाठी आदेश देण्यात आले आहेत. सद्य:स्थितीत ६०१ पदे अजूनही रिक्त आहेत. २६ रुग्णालय व्यवस्थापकांची आवश्यकता असताना  आतापर्यंत तीन जणांना सेवेत रुजू होण्याचे आदेश देण्यात आले आहेत. परिचारिका पदांसाठी ४१३ पदे मंजूर आहेत. यातील ८७ पदे भरली गेली असून पुढील ३२६ पदे भरण्याची प्रक्रिया अजूनही सुरू असल्याचे समजते. क्ष-किरण तंत्रज्ञानाची १७ पदांपैकी फक्त दोन अर्ज आल्याने तसेच ईसीजी तंत्रज्ञांसाठी १५ पदे मंजूर असून तीन भरली गेली आहेत. प्रयोगशाळा तंत्रज्ञांसाठी २३ पदांपैकी आठ जणांना आदेश देण्यात आले आहेत.

करोना उपचार केंद्रांमध्ये साफसफाई करण्यापासून ते रुग्णांना सहकार्य करण्यापर्यंतची महत्त्वाची अशी कक्ष सेवकांची १३३ पदे मंजूर असली तरी आत्तापर्यंत ६४ जणांना सेवेत कार्यरत होण्यासाठी आदेश देण्यात आलेले आहेत.

यातील काही अर्जावर पात्र असलेले अधिकारी-कर्मचारी प्रतिसाद देत नसल्यामुळे ही पदे अजूनही रिक्त  आहेत. वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी यांच्या कमतरतेमुळे नव्याने उभारलेल्या  कोविड आरोग्य केंद्रांमध्ये रुग्णांना सेवा देण्यात अडचणी निर्माण होत आहेत.

   पदे                             मंजूर        नियुक्ती        रिक्त

फिजिशियन                      २५             ०                  २५

भुलतज्ञ                             २१             ०                   २१

एमबीबीएस                       ८३             १                   ८२

रुग्णालय व्यवस्थापक       २६              ३                   २३

परिचारिका                       ४१३            ८७                 ३२६

क्ष—किरण तंत्रज्ञ                १७            २                   १५

ईसीजी तंत्रज्ञ                      १५             ३                  १२

प्रयोगशाळा तंत्रज्ञ               २३             ८                  १५

औषधभंडार अधिकारी       १८               १५                ३

टंकलेखक                         २५               १५                १०

कक्ष सेवक                      १३३               ६४                 ६९

एकूण                              ७९९              १९८               ६०१

आरोग्य यंत्रणेवर असलेला ताण व कर्मचाऱ्यांची कमतरता यानंतरही अव्याहतपणे, अखंडितपणे सेवा सुरूच आहे. डॉक्टरांसह आरोग्य कर्मचाऱ्यांनी स्वत:ची नैतिक जबाबदारी लक्षात घेता पुढे येऊन आरोग्य व जनसेवेसाठी आपली सेवा देणे अपेक्षित आहे. आरोग्य सेवेत सामावल्यानंतर त्यांची योग्य ती खबरदारी घेऊन सुरक्षा दिली जात असल्यामुळे त्यांनी घाबरण्याचे काहीही कारण नाही.

– कांचन वानेरे, जिल्हा शल्य चिकित्सक, पालघर