कला व संस्कृतीचा वारसा जोपासण्याबरोबरच तो वृद्धिंगत होण्याचे कार्य पर्यटनाच्या माध्यमातून होत असते. पर्यटन जिल्हा म्हणून घोषित होऊनसुद्धा सिंधुदुर्गची म्हणावी तशी पर्यटनवृद्धी झाली नाही. आता शासनाच्या माध्यमातून जिल्ह्य़ात विविध पर्यटन प्रकल्प राबविण्यात येत आहेत. या पर्यटन प्रकल्पांना सर्वानी सहकार्य करावे, असे आवाहन पर्यटन राज्यमंत्री राम शिंदे यांनी वेंगुर्ला पर्यटन महोत्सव उद्घाटन प्रसंगी केले. समारंभाच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री दीपक केसरकर होते.
वेंगुर्ला शहराच्या मांडवी बीचवर आयोजित केलेल्या वेंगुर्ला पर्यटन महोत्सवाचे उद्घाटन प्रा. राम शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. वेंगुर्ला महोत्सव १४ फेब्रुवारीपासून तीन दिवस सुरू राहणार असून, या महोत्सवात शंभर स्टॉल लावण्यात आलेले आहेत. या उद्घाटन समारंभापूर्वी वेंगुर्ला शहरातून चित्ररथांची भव्य शोभायात्रा काढण्यात आली होती. मालवणच्या सी वर्ल्ड प्रकल्पास काही जण विरोध करतात, असा उल्लेख करून पर्यटन राज्यमंत्री प्रा. राम शिंदे म्हणाले की, केवळ विरोधासाठी विरोध अशी भूमिका असू नये. यापेक्षा रोजगाराच्या संधी निर्माण करणाऱ्या शासनाच्या अशा पर्यटन प्रकल्पांना सर्वानी सहकार्य करण्याची आवश्यकता आहे. ते पुढे म्हणाले, नुकत्याच झालेल्या महामार्ग चौपदरीकरण योजनेच्या शुभारंभामुळे कोकणची संपर्क यंत्रणा अद्ययावत, गतिमान होणार असून, याद्वारे कोकणातील पर्यटनाला चालना मिळणार आहे. पर्यटनातून रोजगाराच्या संधी निर्माण करून शहराकडे जाणारा तरुणांचा लोंढा आपल्याला रोखता येणार आहे. ते पुढे म्हणाले, वेंगुर्ला नगरपालिकेने मागणी केल्याप्रमाणे पॅडल बोट फ्लोटिंग हॉटेल नॅचरोपॅथी केंद्रासाठीही शासनाद्वारे भरघोस निधी मिळण्यासाठी मी व्यक्तिश: प्रयत्न करत आहे. या वेळी शोभायात्रेतील चित्ररथ स्पर्धेतील विजेत्यांना, तसेच सजावट विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. किरात ट्रस्टच्या वतीने काढण्यात आलेल्या वेंगुर्ला नकाशाचे प्रकाशन व वेंगुर्ला नगरपरिषदेच्या वेंगुर्ला डॉट कॉम या संकेतस्थळाचे उद्घाटनही या वेळी मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले.
आपल्या अध्यक्षीय भाषणात पालकमंत्री दीपक केसरकर यांनी वेंगुर्ला येथील झुलत्या पुलासाठी पावणेतीन कोटी रुपये निधी मंजूर झाल्याचे सांगून सागरेश्वर येथे पर्यटन रिसॉर्ट उभारण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. नवाबाग खाडीतील गाळ काढण्याचे काम येत्या पंधरा दिवसांत सुरू करण्यात येईल, अशी ग्वाही देऊन ते म्हणाले की, तीन कोटी रुपयांची अद्ययावत यंत्रसामग्री यासाठी घेण्यात आली आहे. कोकण ग्रामीण पर्यटन योजनेत नवाबाग गावाची निवड केली आहे. लवकरच या ठिकाणी फिशिंग व्हिलेज ही योजना साकारणार आहे. विकासाचे प्रदर्शन करीत बसण्यापेक्षा सर्वसामान्यांचा सर्वागीण विकास हे माझे स्वप्न असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले. प्रारंभी नगराध्यक्ष प्रसन्ना कुबल यांनी सवाल करून प्रास्ताविकात पॅडल बोट व फ्लोटिंग हॉटेल यासाठी भरीव निधी मिळावा, अशी मागणी केली. शेवटी उपनगराध्यक्ष अभिषेक वेंगुर्लेकर यांनी आभार मानले.
समारंभास माजी आमदार प्रमोद जठार, राजन तेली, अतुल काळसेकर, काका कुडाळकर, सभापती सुचेत्रा वजराठकर, स्नेहा कुबल, अतिरिक्त जिल्हाधिकारी रवींद्र सावळकर, जिल्हा पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे, उपविभागीय अधिकारी विठ्ठल इनामदार, मुख्याधिकारी रामदास कोकरे तसेच नगरसेवक, नागरिक या वेळी उपस्थित होते.