नांदेड मतदारसंघातून माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना मंगळवारी काँग्रेसने उमेदवारी जाहीर केल्यानंतर बुधवारी त्यांनी अर्ज दाखल केला. अर्ज दाखल केल्यावर तरोडा नाका येथून रॅलीद्वारे जोरदार शक्तिप्रदर्शन केले. जुना मोंढा येथे जाहीर सभा होऊन रॅलीचा समारोप झाला.
खासदार भास्करराव पाटील खतगावकर, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बापूसाहेब गोरठेकर यांची या वेळी उपस्थिती होती. अर्ज दाखल केल्यानंतर ठाकरे विमानाने पुण्याला रवाना झाले. चव्हाण यांना उमेदवारी मिळाल्यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला होता. ‘साहेबांनीच’ उभे राहावे, या साठी जिल्ह्य़ाच्या बहुतांश भागातील काँग्रेसचे कार्यकर्ते आग्रही होते. अपेक्षेप्रमाणे चव्हाण यांना उमेदवारी मिळाल्याने सकाळपासूनच चव्हाण यांना शुभेच्छा देण्यासाठी वेगवेगळ्या भागातील कार्यकर्ते शिवाजीनगर येथील निवासस्थानी जमले. दुपारी १२ वाजता तरोडा नाका परिसरातून मोठी रॅली निघाली. ढोलताशांच्या गजरात काँग्रेसच्या विजयाच्या घोषणा देत निघालेली रॅली तब्बल ३ तासानंतर जुना मोंढा येथे पोहोचली. तेथे रॅलीचे जाहीर सभेत रूपांतर झाले. युवक, व्यापारी व महिलांची संख्या लक्षणीय होती. ठिकठिकाणी चव्हाण यांचे स्वागत झाले. फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. या वेळी चव्हाण यांनी मराठवाडय़ात सर्वच जागांवर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले. सध्या वारे वाहात असल्याची चर्चा असली, तरी हे वारे कृत्रिम आहेत. त्यामुळे जातीयवादी शक्तींना थांबविण्यासाठी कोणत्याही भूलथापांना बळी न पडता आघाडीच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन चव्हाण यांनी केले.
नांदेड मतदारसंघातून १५ पैकी १२ वेळा काँग्रेसच्या उमेदवाराचा विजय झाला. कशीही स्थिती आली, तरी आपण पक्षनिष्ठा सोडली नाही किंवा पक्ष बदलले नाही. इंदिरा गांधी, राजीव गांधी व आता सोनिया गांधी यांची कारकीर्द आपण जवळून पाहिली आहे. श्रेष्ठींनी माझी पाठराखण करीत माझ्यावर विश्वास टाकला. हा विश्वास सार्थ ठरविण्यासाठी काँग्रेसला विजयी करावे, असेही ते म्हणाले. नांदेडकरांनी एकदा भाजपच्या डी. बी. पाटील यांना संधी दिली होती, पण त्यांच्या कारकिर्दीत कोणताही विकास झाला नाही.
खासदार खतगावकर, आमदार सातव, महापौर अब्दुल सत्तार, आमदार अमरनाथ राजूरकर, रामप्रसाद बोर्डीकर, माधवराव पवार, शंकरअण्णा धोंडगे, वसंत चव्हाण, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बी. आर. कदम, अमिता चव्हाण, पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष बापूराव गजभारे यांची उपस्थिती होती.
व्हिजन, डिव्हिजन, टेलिव्हिजन..!
‘राहुल फॉर व्हिजन, मोदी फॉर डिव्हिजन व केजरीवाल फॉर टेलिव्हिजन’ हे आता जनतेला कळले आहे, असे सांगून चव्हाण यांनी या निवडणुकीद्वारेच देशाची सूत्रे कोणाकडे द्यायची हे ठरणार असल्याने कार्यकर्त्यांनी प्रत्येक घराघरांत काँग्रेसचा विचार पोहोचावा, असे आवाहन केले.