अलिबाग :  मी पुन्हा मुख्यमंत्री होणार असे म्हणत जनादेश यात्रा काढणारे मुख्यमंत्री पहिल्यांदाच पाहिले आहेत. पाच वर्ष कामे केली असती तर हि वेळ आली नसती.  युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे प्रदुषण मुख्य महाराष्ट्र करण्याची भाषा करत आहेत. मग  पर्यावरण मंत्री रामदास कदम काय करत होते. पाच वर्षांत शिवसेनेच्या मंत्र्यांनी केलेली १५ कामे दाखवा असे म्हणत खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी शिवसेना भाजपवर निशाणा साधला. ते कर्जत येथे शिवस्वराज्य यात्रे दरम्यान आयोजीत सभेत बोलत होते.

यावेळी खासदार सुनील तटकरे, रुपाली चाकणकर, जिल्हाध्यक्ष दत्ता मसुरकर, जिल्हा परिषद सभापती नरेश पाटील, उमाताई मुंढे, खोपोली नगराध्यक्ष सुमन आवसरमल, अंकित साखरे आदी उपस्थित होते.

राज्यात ’एक जनादेश यात्रा  आणि एक जन आशिर्वाद यात्रा सुरू आहे. यात एक जण मी परत येणार असल्याची भाषा करत आहेत.  दुसरे म्हणतात मी फक्त आशीर्वाद घ्यायला आलोय मुख्यमंत्री करा अशी याचना करत आहेत. म्हणजेच या दोन्ही यात्रा स्वार्थी यात्रा आहे. आमची यात्रा कुणाला मुख्यमंत्री करा हे सांगायला नाही तर शिवस्वराज्य आणण्यासाठी आहे. रयतेचा राज्य आणण्यासाठी आहे.

राज्यात पाच वर्षांत 983 कारखाने बंद झाले. १ लाख ४३ हजार लहान मोठे उद्योग बंद झाले. यामुळे अनेक लोक बेरोजगार झाले. मुख्यमंत्री यावर काही बोलायला तयार नाही. शेतकरी आत्महत्या, कर्जमाफी विषय काढले याबद्दलही बोलायला तयार नाहीत. आदित्य ठाकरे आज नवा महाराष्ट्र घडवण्याची भाषा करत आहेत. मग पाच वर्ष शिवसेनेचे मंत्री नेमके काय करत होते असा सवाल कोल्हे यांनी यावेळी केला. यावेळी जिल्हाध्यक्ष दत्ता मसुरकर, आमदार सुरेश लाड आणि खासदार सुनील तटकरे यांनीही उपस्थितांना संबोधित केले.