गेल्या ९ वर्षांत काँग्रेसच्या हायकमांडने दिलेला शब्द पाळला नसून आपल्यासह सहकाऱ्यांचा योग्य सन्मान ठेवलेला नाही, असा इशारा देत कोकणी माणूस कोणत्याही परिस्थितीत अन्याय सहन करणार नसल्याचे स्पष्ट प्रतिपादन राज्याचे उद्योगमंत्री काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा उद्योगमंत्री नारायण राणे यांनी केले आहे. मुख्यमंत्रीपदी आपणाला संधी दिली असती तर राज्यात फरक घडवून दाखविला असता असा विश्वास त्यांनी याप्रसंगी व्यक्त केला. लोकसभेतील विजय हा क्षणिक असून येणाऱ्या निवडणुकीत वेगळे परिणाम दिसून येतील असे मत त्यांनी महाड येथे पत्रकारांशी संवाद साधताना व्यक्त केले.
माझ्यावरती सतत टीका करणारे बिळातून बाहेर आलेले उद्धव ठाकरे यांच्या टीकेला शुक्रवारी सायंकाळी आपण उत्तर देणार असून त्यांचे पूर्ण वस्त्रहरण करणार असल्याचे नारायण राणे यांनी स्पष्ट केले.
काँग्रेसमध्ये नाराज असणारे उद्योगमंत्री नारायण राणे येत्या सोमवारी मंत्रिपदाचा राजीनामा देणार असून या पूर्वसंध्येला कोकणच्या दौऱ्यावर निघाले असता महाड येथील हॉटेल विसावा येथे पत्रकार परिषद घेऊन शुक्रवारी सायंकाळी रत्नागिरी येथील हातखंबा येथील सभेत उद्धव ठाकरे यांचे वस्त्रहरण करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. मोदी किंवा अमित शहा तथा इतर कुठल्याही पक्षांच्या नेत्याबरोबर भेट झाली नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. काँग्रेस नाराजीबद्दल बोलताना राणे म्हणाले की, काँग्रेसने दिलेला शब्द पाळला नसून आपल्या कार्यकर्त्यांना कोठेही सामावून घेतले नसल्याचे त्यांनी सांगितले. हा एक प्रकारे कोकणावरती अन्याय असून मागील इतर नेत्यांप्रमाणे मी तो सहन करणार नाही.
दरम्यानच्या काळात माणिकराव ठाकरे व कृपाशंकर सिंह आपल्या भेटीला आले होते. मात्र त्यांच्याकडून कोणतेही आश्वासन मिळालेले नाही आणि आश्वासनाची वेळही निघून गेलेली आहे. स्वतंत्र पक्ष काढण्याबाबत विचारले असता माझ्या समर्थकांची ही मागणी आहे, परंतु माझी तशी तयारी नाही. काँग्रेसने मुख्यमंत्रिपदाची संधी दिली असती तर महाराष्ट्राच्या प्रगतीचे चित्र बदलले असते. मात्र विद्यमान मुख्यमंत्री यांचे कर्तृत्व नसल्याचे मान्य केले. नुकत्याच मिळालेल्या मराठा समाजाचे आरक्षण याचे श्रेय जनता मलाच देईल, मी या समितीचा अध्यक्ष नसतो तर हे मराठा आरक्षण मिळाले नसते असेही त्यांनी स्पष्ट केले.
मंत्रिपदाच्या राजीनाम्यानंतर तटकरे यांच्याशी बोलणे झाले का? असे विचारले असता त्यांना विनोदी शैलीत आपण उत्तर दिले. तुम्ही ज्या मंत्रिमंडळात नाहीत त्या मंत्रिमंडळात मी नसेन, तसेच मोदींचा प्रभाव हा क्षणिक होता. लोकांना सत्य परिस्थितीची जाणीव होऊ लागली आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले. कोकण विकासाच्या आढावा बठकीच्या विलंबनाबाबत विचारले असता त्यास मी कारणीभूत नाही असे उत्तर राणे यांनी यावेळी दिले. रामदास आठवले हे आपले मित्र असून त्यांची इच्छा आपण पूर्ण करू शकत नाही, असे उत्तर आरपीआय पक्षाच्या निमंत्रणाच्या विचारलेल्या प्रश्नांना दिले. कोकणच्या महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाला विलंब होत असल्याचे पत्रकारांनी विचारले असता येत्या १० दिवसांत तुम्हाला योग्य ते उत्तर मिळेल असे राणे यांनी यावेळी सांगितले.
ना. राणे यांनी या पत्रकार परिषदेमध्ये मुख्यमंत्रिपदी कोण आहे, ते पाहून त्याच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवणे महत्त्वाचे असल्याचे मत व्यक्त केले. गेली ४८ वर्षे राजकारणात कार्यरत असताना संपूर्ण राज्याच्या विकासाच्या वेगळ्या कल्पना माझ्याकडे तयार होत्या. मात्र त्या पूर्ण करण्याची संधी पक्ष नेतृत्वाने दिली नसल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली.
यावेळी नारायण राणे यांच्यासह माजी आ. श्यामभाई सावंत, डॉ. प्रभाकर जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.