विठ्ठल मंदिरात १ जानेवारीपासून मोबाईल बंदी

पंढरीतील श्री विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या ‘ऑनलाइन दर्शन’ सेवेसाठी आता पैसे मोजावे लागणार आहेत. आजवर मोफत असलेली ही सेवा आता सशुल्क करण्यास मंदिर समितीच्या बैठकीत तत्त्वत: मान्यता देण्यात आली आहे. लवकरच याचा निर्णय जाहीर केला जाणार आहे. याशिवाय नवीन वर्षांपासून म्हणजेच १ जानेवारी २०२० पासून श्री विठ्ठल मंदिरात मोबाईल नेण्यावरही बंदी घालण्यात आल्याचा निर्णय मंदिर समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे. मंदिर समितीचे सहअध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हे निर्णय घेण्यात आले आहेत. या वेळी समिती सदस्य ह .भ.प. ज्ञानेशवर महाराज जळगावकर, प्रकाश जवंजाळ, संभाजी शिंदे, शकुंतला नडगिरे, साधना भोसले, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड आदी उपस्थित होते.

मंदिराच्या सुरक्षेसाठी तसेच मंदिरातील पावित्र्य, शांतता कायम राखण्याच्या हेतूने गेले अनेक दिवस मंदिरात येणाऱ्या भाविकांकडून मोठय़ा प्रमाणात होत असलेल्या मोबाईल वापरावर सतत नाराजी व्यक्त केली जात होती. या पाश्र्वभूमीवर आजच्या बैठकीत नवीन वर्षांपासून मंदिरात मोबाईल नेण्यास बंदी घालण्यात येणार आहे. यासाठी  मंदिर समितीकडून भाविकांना मोबाईल ठेवण्यासाठी ‘लॉकर्स’ची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. मंदिरात आल्यावर भाविकांकडून फोटो काढणे, मोबाईलवर बोलणे या सारखे प्रकार वाढू लागल्याने हा निर्णय घेतल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी दिली आहे.

दरम्यान मंदिर समितीकडे जवळपास ५५ लाख रुपयांची नाणी जमा झाली आहेत. ही नाणी आता एच.डी.एफ.सी. बँकेने घेण्याची जबाबदारी स्वीकारली आहे. त्या बँकेत खाते उघडून ही नाणी जमा करण्यास बैठकीत मंजुरी मिळाली आहे. तसेच श्री विठ्ठल सभामंडप व श्री रुक्मिणी सभामंडप येथे मंदिर समितीचे कार्यक्रम वगळून सप्ताह, भजन, कीर्तन व अन्य कार्यR मासाठी ध्वनिक्षेपक न लावण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला. याशिवाय निगडी येथील भक्ती शक्ती चौकाच्या धर्तीवर मंदिरावर ध्वज उभारणे, श्री संत नामदेव महाराज यांची ७५० वी जयंती साजरी करणे, संत नामदेव पायरीचे संवर्धन करणे आदी निर्णयही या बैठकीत घेण्यात आले.

या बैठकीत अंतर्गत सुरक्षेसाठी ३५ सुरक्षा कर्मचारी नियुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच नुकतेच अपघाती निधन झालेल्या सोपान महाराज नामदास (संत नामदेव महाराज यांचे १७ वे वंशज)  आणि अतुल महादेव आळशी यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी अडीच लाख रुपये मदत करण्याचा निर्णयदेखील घेण्यात आला.

..तर समितीचे उत्पन्न वाढेल

सध्या ‘ऑनलाइन दर्शना’साठी कुठलेच शुल्क आकारले जात नाही. परंतु ‘ऑनलाइन दर्शन’सेवा घेतलेल्या भाविकांना दर्शन रांगेतील भाविकांना थांबवून अनेकदा सोडले जाते. हे प्राधान्य देण्यासाठी आता ‘ऑनलाइन दर्शना’साठी शुल्क आकारण्यास तत्त्वत: मान्यता देण्यात आली आहे. या बाबत समितीच्या  सह अध्यक्षांनी हा निर्णय झाला असला तरी त्याचा आदेश राखून ठेवला आहे. जर हा निर्णय झाला तर समितीच्या उत्पन्नात वाढ होईल असे मत विठ्ठल जोशी यांनी व्यक्त केले.