मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाला बाळासाहेब ठाकरेंचे नाव देण्यास माजी महाधिवक्ता श्रीहरी अणे यांनी कडाडून विरोध केला आहे. फेसबुक पोस्टद्वारे एक पोस्ट लिहून त्यांनी बाळासाहेब ठाकरेंचे नाव देण्यास विरोध दर्शवला आहे. समृद्धी महामार्गापेक्षा पुण्यातल्या सदाशिव पेठेला ठाकरे पेठ असे नाव द्या असा खोचक सल्लाही अणे यांनी दिला आहे. बाळासाहेब ठाकरेंचे नाव समृद्धी महामार्गाला द्या अशी मागणी शिवसेनेने केली आहे. तर या मार्गाला अटलबिहारी वाजपेयींचे नाव दिले जावे असा भाजपाचा मानस आहे. या वादात आता श्रीहरी अणेंनीही उडी घेतली आहे.

श्रीहरी अणेंनी काय म्हटले आहे?
विदर्भाचा पुन्हा अपमान केला जातो आहे. समृद्धी महामार्ग हे नाव काय वाईट आहे? विदर्भासाठी शिवसेनेच्या एकाही नेत्याने काहीही केलेले नाही. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंनी विदर्भाला दिलेली वचनं पाळली नाहीत. एवढंच नाही तर शिवसेनेच्या एकाही नेत्याने विदर्भासाठी काहीही केले नाही. त्यांची नावे मुंबई किंवा पुण्यातच शोभतील. पुण्यातल्या सदाशिव पेठेला ठाकरे पेठ नाव द्या पण समृद्धी महामार्गला नको.

विदर्भातील या महामार्गाचे नाव समृद्धी महामार्गच योग्य आहे. नाहीतर विदर्भ महामार्ग असे नाव द्यावे. व्यक्ती विशेष नावे हवी असतील तर महात्मा गांधी, ज्यांची विदर्भ ही कर्मभूमी होती, त्यांचे नाव देण्यात यावे.

श्रीहरी अणे यांनी अशी रोखठोक भूमिका घेतली आहे. एकनाथ शिंदे यांनी समृद्धी महामार्गाला बाळासाहेब ठाकरेंचे नाव देण्यासंबंधीचे जे पत्र मुख्यमंत्र्यांना लिहिले आहे ते पोस्ट करून त्यावर आपली भूमिका अणे यांनी फेसबुकवरून मांडली आहे.