26 September 2020

News Flash

‘श्री विठ्ठल, रखुमाई मंदिराला मूळ रूप येणार’

पुरातत्व विभागाच्या पथकाने केली मंदिराची पाहणी

पुरातत्व विभागाचे विलास वहाणे, प्रदीप देशपांडे, औसेकर महराज आणि पथकाने श्री विठ्ठल मंदिराची पाहणी केली (छाया: राजू बाबर, पंढरपूर)

येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर आणि मंदिर समितीच्या अखत्यारीत असलेल्या २८ परिवार देवतांच्या मंदिराची पुरातत्व विभागाकडून पाहणी करण्यात आली आहे. श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मंदिराला मुळ रूप देण्यासाठी लवकरच एक अहवाल मंदिर समितीला सादर केला जाईल, अशी माहिती पुरातत्व विभाग सहायक संचालक विलास वहाणे यांनी दिली आहे. यासाठी मंदिरात अनावश्यक तो बदल करून मंदिराचे गत वैभव प्राप्त होईल, असे त्यांनी यावेळी सांगितले. पुरातत्व विभागाच्या पथकाने रविवारी पाहणी केली.

येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर हे पुरातन काळातील स्थापत्यकलेचा एक उत्कृष्ट नमुना आहे. मात्र कालांतराने या मंदिराच्या बांधकामात अनावश्यक बदल केला गेला. तर आजमितीस मंदिरातील अनेक ठिकाणी दगडी बांधकामातील दगड निसटू लागले आहेत. या पार्श्वभूमीवर मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले यांनी मंदिराचे पुरातत्व टिकवण्यासाठी आणि संवर्धन करण्यासाठी राज्यातील तसेच केंद्रातील पुरातत्व विभागाशी पाठपुरावा केला. पुरातत्व विभागाने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर आणि परिवार देवता यांची पाहणी करून एक अहवाल समितीला नुकताच दिला. यामध्ये मंदिरातील लाईट कनेक्शन, अनेक मूर्तींवर तेल, खाद्य पदार्थ लावणे, मंदिरावर केलेले रंगकाम, गर्भगृहात वातानुकुलीत यंत्रणा, फरशी, दर्शन रांगा आदींबाबत आक्षेप नोंदविले आहेत. याबाबत समितीच्या बैठकीत याबाबत तातडीने उपाय योजना करून मंदिराचे गत वैभव पुन्हा प्राप्त करण्यासाठी पुरातत्व विभागाच्या मदतीने बदल करावा असा निर्णय घेण्यात आला.

या पार्श्वभूमीवर पुरातत्व विभागाचे पुणे येथील सहाय्यक संचालक विलास वहाणे, डॉ. पी.जी.साबळे, वास्तू रचनाकार प्रदीप देशपांडे आणि त्यांच्या पथकाने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराची पाहणी केली. या वेळी मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महराज औसेकर, समितीचे सदस्य ज्ञानेश्वर महाराज जळगावकर, शिवाजी मोरे या वेळी उपस्थित होते.

या वेळी पुरातत्व विभागाने मंदिराच्या बाबतीत माहिती दिली. श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यामध्ये ग्रॅनाईट बसविण्यात आले आहे. या मुळे मुर्तीवर आर्द्रतेचा परिणाम होऊ शकतो, असा निष्कर्ष त्यांनी काढला आहे. त्यामुळे ग्रॅनाईट, चुकीचे विद्युत जोडणी आदी केलेले बदल काढावे लागणार आहेत. त्यामुळे पर्यायाने मंदिराचे आणि मूर्तीच्या आयुष्यमानात अजून वाढ होईल. मात्र यामुळे मंदिराला कोणताही धोका नाही असे वहाणे यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, संत नामदेव पायरी पासून पश्चिम द्वारपर्यंतचे मंदिराच्या वास्तूची पाहणी पुरातत्व विभागाच्या पथकाने केली आहे. येत्या काळात मंदिराचे स्ट्रक्चरल ऑडिट करून मंदिरात पुरातन रूप राहण्याच्या दृष्टीने काम केले जाणार आहे. आतापर्यंत श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर पुरातत्व विभागाच्या अखत्यारित नव्हते. मात्र हे मंदिर पुरातत्व विभागाच्या अधिकारात आणण्यासाठी आवश्यक प्रयत्न होणार आहेत. याबाबत लवकरच एक अहवाल आणि त्यासाठी येणारा खर्च याबाबतची माहिती समितीला देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. एकंदरित पुरातत्व विभागाने मंदिराच्या संवर्धनासाठी आता तातडीने कामे पूर्ण करून मंदिराला गत वैभव प्राप्त करून द्यावे अशी मागणी भाविकातून होत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 20, 2019 7:37 pm

Web Title: shri vitthal rukmini temple will come in original form says department of archeology
Next Stories
1 समृद्धी महामार्गाला राजमाता जिजाऊ यांचे नाव द्या, धनंजय मुंडे यांची मागणी
2 नारायण राणे पुन्हा काँग्रेसमध्ये परतणार? बाळासाहेब थोरात यांचे सूचक वक्तव्य
3 महाराष्ट्र शासन म्हणजे स्मारकांचे इव्हेंट करणारे सरकार : सत्यजित तांबे
Just Now!
X