अ‍ॅड. श्रीहरी अणे यांचा आरोप; सत्तेसाठीच स्वतंत्र विदर्भाबाबत राजकीय पक्ष उदासीन
स्वतंत्र विदर्भ राज्याची चळवळ ही वैचारिक बैठकीतून यशस्वी होणार आहे. समाजमाध्यमांचा वापर स्वतंत्र विदर्भ राज्याच्या निर्मितीसाठी महत्त्वाचा ठरू शकतो. राजकीय पक्षांकडून विदर्भातील गठ्ठामतांच्या भरवशावर महाराष्ट्रावर राज्य केले जाते. त्यामुळे सत्तेच्या लोभापायी प्रमुख राजकीय पक्षांकडून विदर्भ वेगळा करण्यासाठी पुढाकार घेतला जात नसल्याचा आरोप राज्याचे माजी महाधिवक्ता विदर्भवादी अ‍ॅड. श्रीहरी अणे यांनी पत्रकारांशी बोलताना केला.
स्वतंत्र विदर्भ राज्यनिर्मितीची उचित वेळ असल्याने आता आंदोलनाची हाक आहे. एका पक्षाच्या भरवशावर विदर्भ राज्य मिळेल, या अपेक्षेवर विसंबून राहणे योग्य ठरणार नाही. त्यामुळे वेगवेगळ्या राजकीय पक्षांतील विदर्भ समर्थकांच्या सहकार्याने हे आंदोलन पुढे नेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
भाजपच्या पुढाकाराने स्वतंत्र विदर्भ राज्याची निर्मिती होऊ शकते. मात्र, भाजप त्यांच्या गतीने ही प्रक्रिया पार पाडेल. राज्यात स्वतंत्र विदर्भाच्या मुद्दय़ावर भाजपने निवडणूक लढवली. त्यात भरघोस यश मिळाले, त्यामुळे आता संसदेत कायदा करून त्यांनी स्वतंत्र विदर्भ राज्यनिर्मितीची प्रक्रिया सुरू करावी. मात्र, अद्याप भाजपने त्या दिशेने प्रक्रिया सुरू केलेली नाही. त्याबाबत ते बोलायलाही तयार नाहीत, असा आरोप अ‍ॅड. अणे यांनी
केला.
देशातील एकंदरीत वातावरण बघता आपणासही व्यक्तिस्वातंत्र्याची झळ पोहोचली. विदर्भ राज्यासाठी घेतलेल्या भूमिकेमुळे अराजकीय खूश, तर प्रस्थापित यंत्रणा अडचणीत आली आहे. विदर्भ व पश्चिम महाराष्ट्र हे समतोल प्रमाणात पुढे जात नाही, त्यामुळे आज स्वतंत्र विदर्भ राज्याची गरज आहे.
मिहान प्रकल्पासाठी केंद्रीय मंत्री गडकरी व मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुढाकार घेतला. मिहान विदर्भातील सर्वात मोठा प्रकल्प जरी असला तरी त्यामुळे विदर्भातील शेतकरी आत्महत्या थांबणार नाहीत, असे परखड मतही अणे यांनी व्यक्त केले.

भाजप, काँग्रेसकडून अपेक्षा नाही
आधी काँग्रेसचे आणि आता केंद्रात भाजपचे सरकार आहे. मात्र, त्यांच्याकडून स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी पुढाकार दिसत नाही. त्यासाठी भाजपची राज्ये सोडून इतर सरकारे असलेल्या राज्यांशी चर्चा करावी लागेल. विदर्भासाठी त्यांचा पाठिंबा महत्त्वाचा आहे. आम आदमी पार्टी, बहुजन समाज पक्ष, नितीशकुमारांचा पक्ष यांच्यासह अनेक पक्षांचा पाठिंबा मिळत आहे. तोच स्वतंत्र राज्यासाठी महत्त्वाचा आहे. त्यामुळे आपला भर आता राज्याबाहेर अधिक आहे. भाजप व काँग्रेसकडून कोणत्याही अपेक्षा दिसत नसल्याचे अ‍ॅड. अणे यांनी स्पष्ट केले.