News Flash

अणे प्रकरणावरून शिवसेना भाजप विधानसभेत आमनेसामने

गोंधळामुळे अध्यक्षांनी कामकाज दहा मिनिटांसाठी तहकूब केले

शिवसेनेच्या सदस्यांनी विधीमंडळाच्या इमारतीबाहेरही या विषयावरून निदर्शने केली आहेत. या प्रकरणावर शिवसेनेने अणेंविरोधात आणलेला हक्कभंग प्रस्ताव विधानसभा अध्यक्षांनी फेटाळला होता.

राज्याचे महाधिवक्ता श्रीहरी अणे यांनी वेगळ्या विदर्भासंदर्भात केलेल्या वक्तव्यावरून शिवसेना आणि भाजपचे विदर्भातील आमदार गुरुवारी विधानसभेमध्ये आमनेसामने आले. शिवसेनेचे सदस्य अखंड महाराष्ट्राच्या घोषणा देत असताना विदर्भातील भाजपच्या आमदारांनीही वेगळ्या विदर्भाच्या बाजूने घोषणा देण्यास सुरुवात केली. यामुळे सभागृहात गोंधळाचे वातावरण निर्माण झाल्यामुळे कामकाज दहा मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले.
श्रीहरी अणे यांनी विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू होण्यापू्र्वी वेगळ्या विदर्भाच्या बाजूने वक्तव्य केले होते. त्यांच्या याच वक्तव्यावरून शिवसेना अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून आक्रमक आहे. याच विषयावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी विधान परिषदेत निवेदन करताना अणे यांचे विधान त्यांचे वैयक्तिक असल्याचे म्हटले होते.
फडणवीस यांनी विधान परिषदेत निवेदन केले, मात्र, विधानसभेत अद्याप त्यांनी निवेदन केलेले नाही. ज्या दिवशी वरच्या सभागृहात निवेदन केले जाते. त्याच दिवशी खालच्या सभागृहातही निवेदन केले पाहिजे, असे संकेत आहेत, असा मुद्दा शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी उपस्थित केला. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांनीही त्यांची बाजू उचलून धरली. मुख्यमंत्र्यांनी आधी खालच्या सभागृहात निवेदन केले पाहिजे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या जयंत पाटील यांनी केली. त्यानंतर सभागृहात गोंधळाची स्थिती निर्माण झाली. त्यातच अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी सरकारने खालच्या सभागृहात निवेदन करावे, असे निर्देश दिले. पण शिवसेनेचे सदस्य ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हते. त्यांनी व्हेलमध्ये जमून घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. त्याला भाजपच्या विदर्भातील आमदारांनीही प्रत्युत्तर दिले. याच गोंधळात अध्यक्षांनी कामकाज दहा मिनिटांसाठी तहकूब केले.
शिवसेनेच्या सदस्यांनी विधीमंडळाच्या इमारतीबाहेरही या विषयावरून निदर्शने केली आहेत. या प्रकरणावर शिवसेनेने अणेंविरोधात आणलेला हक्कभंग प्रस्ताव विधानसभा अध्यक्षांनी फेटाळला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 17, 2015 3:18 pm

Web Title: shrihari aney issue shivsena bjp fight in assembly
टॅग : Bjp,Shrihari Aney
Next Stories
1 शेतकऱयांच्या कर्जमाफीसाठी राष्ट्रवादी आक्रमक, विधानभवनाबाहेर जोरदार निदर्शने
2 संघाच्या भैय्याजी जोशींकडून भाजप आमदारांचे बौद्धिक
3 संगणक परिचालक मोर्चावर पोलिसांचा लाठीमार
Just Now!
X