नांदेडच्या गुरुद्वारासाठी २२०० कोटी, नाशिकच्या कुंभमेळ्यासाठी १२०० कोटी रुपये दिले जातात. मग हजारो वर्षांचा इतिहास असलेल्या कोल्हापूरला तीर्थक्षेत्राचा दर्जा का मिळत नाही, असा सवाल उपस्थित करत कोल्हापूर उत्तर मतदारसंघाचे उमेदवार महेश जाधव यांनी भारतीय जनता पक्षाची सत्ता आल्यावर कोल्हापूरला तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळवून देणारच, असे प्रतिपादन केले. मंगळवार पेठ येथील सुबराव गवळी तालीम चौकातील सभेत ते बोलत होते. निवडणुकांपूर्वी आश्वासने देऊन सत्ता आल्यानंतर या आश्वासनांकडे पाठ फिरवणाऱ्या उमेदवारांना कोल्हापूरची स्वाभिमानी जनता नक्कीच जागा दाखवेल. कोल्हापूरच्या सर्वागीण विकासासाठी भाजप नेहमी अग्रेसर असून जनता आपणाला चांगल्या मताधिक्याने निवडणून देणार असा विश्वासही त्यांनी या वेळी व्यक्त केला.  
काँग्रेस-राष्ट्रवादीवर टीकांची तोफ झाडत जाधव म्हणाले, यामधील पंधरा राज्यकर्त्यांनी ११ लाख ८० कोटींचा भ्रष्टाचार केला असून, भाजपची सत्ता आल्यावर एकही नेता तुरुंगाबाहेर राहणार नाही. २०१९ पर्यंत भारताच्या सर्वागीण विकासासाठी मोदींच्या स्वप्नाला साकार करू या. यासाठी येथील जनतेनी मला विधानसभेत पाठवा असे आवाहनही जाधव यांनी या वेळी केले. कोल्हापूरच्या प्रत्येक प्रश्नांवर आपण नेहमीच आवाज उठवला आहे. सत्तेसाठी क्षणात या पक्षामधून त्या पक्षात जाणाऱ्यांना थारा देऊ नका. आपण मला प्रचंड मताने विजयी करा, असेही ते या वेळी म्हणाले. या वेळी ज्येष्ठ नागरिक अप्पासाहेब आळवेकर, नवतेज देसाई, मुरलीधार सुतार, अशोक देसाई, हेमंत आराध्ये उपस्थित होते.