पुण्याचा श्रीनिवास वस्के हा येथे महाराष्ट्र बॉडीबिल्डर्स असोसिएशनच्या वतीने आयोजित शरीरसौष्ठव स्पर्धेत ‘महाराष्ट्र श्री २०१३’चा मानकरी ठरला. त्यास रुपये २१ हजार व करंडक प्रदान करण्यात आला. स्पर्धेवर पुणे व अहमदनगरच्या स्पर्धकांनी वर्चस्व मिळविले.
स्पर्धेतील उत्कृष्ट प्रात्यक्षिकांसाठी मुंबईचा शंकर दारगे, तर ‘वर्षांतील उदयोन्मुख शरीरसौष्ठवपटू’ हा मान अहमदनगरच्या वाजीद खानने मिळविला. राज्य संघटनेचे उपाध्यक्ष कैलास साळवे यांच्या पुढाकाराने येथील खुटवडनगरमधील वावरे लॉन्स येथे आयोजित या स्पर्धेत महाराष्ट्रातील १४० शरीरसौष्ठवपटूंनी सहभाग घेतला. भारतीय तसेच महाराष्ट्र राज्य शरीरसौष्ठव संघटनेचे महासचिव सुरेश कदम, उपाध्यक्ष डॉ. दीपक सोनवणी, कैलास साळवे, अर्जुन टिळे, दीपक पाटील, अ‍ॅड. अजित पाटील, दीपक बागूल, सुनील घरटे यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.
स्पर्धेस प्रमुख पाहुणे म्हणून सुनील बागूल, सिन्नरचे माजी नगराध्यक्ष हरिश्चंद्र लोंढे आदी उपस्थित होते. स्पर्धेतील गटवार विजेत्यांमध्ये ५५ किलो गटात प्रशांत तांबीटकर (मुंबई), ६० किलो अली हसन शेख (पुणे), ६५ किलो विशाल दिघे (पुणे), ७० किलो श्रीनिवास वस्के (पुणे), ७५ किलो प्रशांत जाधव (पुणे), ८० किलो पवन थोरात (पुणे), ८५ किलो वाजीद खान (अहमदनगर) यांचा समावेश आहे. स्पर्धेचे सूत्रसंचालन निवेदिका सीमा पेठकर यांनी केले.