हर्षद कशाळकर

निसर्ग चक्रीवादळाच्या पंधरा दिवसांनंतरही श्रीवर्धन तालुका अंधारात आहे. तालुक्यातील वीजपुरवठा सुरळीत करण्यात महावितरणला यश आलेले नाही. विजेअभावी नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणांवर अवलंबून न राहता कुडगावमधील ग्रामस्थांनी वर्गणी काढून नवीन जनरेटर खरेदी केला आहे.

३ जूनला दुपारी १२ वाजता श्रीवर्धनच्या किनाऱ्यावर धडकलेल्या चक्रीवादळाने तालुक्यात बहुतांश गावांना तडाखा दिला. हजारो घरांची पडझड झाली. घरांची छपरे उडाली. धान्य भिजले. रस्ते वाहतूक आणि संपर्क यंत्रणा कोलमडली, विजेचे खांब आणि विद्युतवाहिन्या उद्ध्वस्त झाल्या. त्यामुळे वीजपुरवठाही खंडित झाला. या घटनेला १५ दिवस उलटूनही नागरिकांचे हाल संपलेले नाहीत. तालुक्यातील वीजपुरवठा सुरळीत झालेला नाही, अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते एजाज हवालदार आणि स्थानिक रहिवासी अस्लम रईस यांनी दिली.

जनरेटरची कहाणी… : वादळानंतर कुडगावमधील वीजपुरवठा खंडित झाला. परिणामी पाणीपुरवठाही बंद पडला. पाण्याअभावी लोकांचे प्रचंड हाल होत होते. पाणीपुरवठय़ाचा स्रोत अडगळीच्या ठिकाणी असल्याने शासनाचा जनरेटर दररोज पोहोचवणे आणि परत वर आणणे शक्य नव्हते. त्यामुळे शासनाच्या मदतीवर अवलंबून न राहता गावातील लोकांनी एकत्र येत जनरेटर खरेदी करण्याचा निर्णय घेतला. प्रत्येक घरातून वर्गणी काढून ३ लाख रुपये जमा केले आणि सिल्वासा येथून जनरेटर विकत आणला.

मेणबत्ती ४० रुपये, मोबाइल चार्जिगसाठी ५० रुपये

वीजपुरवठा खंडित असल्याने सध्या मेणबत्त्यांची मागणी वाढली आहे. मात्र मागणीच्या तुलनेत मेणबत्त्या उपलब्ध नसल्याने किमती वाढल्या आहेत. एक मेणबत्ती ४० रुपयांना विकली जात आहे, तर जनरेटरवर मोबाइल चार्ज करण्यासाठी तासाला ५० रुपये दर आकारला जात आहे. दुधाचे दरही वाढले आहेत. दुधाची पिशवी २२ रुपयांऐवजी ३० रुपयांना विकली जात असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. पीठ दळण्यासाठी वाढीव रक्कम मोजावी लागत आहे.