विधान परिषदेवर निवडून गेल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे ही विधानसभा निवडणूक लढवणार नसले तरी, श्रीवर्धन मतदारसंघ राष्ट्रवादीकडे कायम राखण्याचे आव्हान त्यांच्यासमोर असणार आहे. कोकणातील सर्वाधिक विकासनिधी आलेल्या या मतदारसंघावर आपले वर्चस्व कायम असल्याचे त्यांना या निमित्ताने दाखवून द्यावे लागणार आहे.     
श्रीवर्धन, तळा, म्हसळा, रोहा, माणगाव तालुक्यांमधील काही भाग मिळून हा मतदारसंघ तयार झाला आहे. अतिदुर्गम मतदारसंघ म्हणूनही या मतदारसंघाची ओळख आहे. मतदारसंघात एकूण २ लाख ४० हजार ३१५ मतदार आहेत. यात १ लाख १७ हजार ७७६ पुरुष तर १ लाख २२ हजार ६३९ महिला मतदारांचा समावेश आहे. याशिवाय ८५ सव्र्हिस वोटर आहेत. पुरुषांच्या तुलनेत महिला मतदारांचे प्रमाण अधिक असणारा हा रायगड जिल्ह्य़ातील एकमेव मतदारसंघ आहे. मतदारसंघात ३३५ मतदान केंद्रे आहेत. बॅरिस्टर ए. आर. अंतुले यांचा मतदारसंघ म्हणूनही या मतदारसंघाची ओळख आहे. बॅरिस्टर अंतुले यांनी चार वेळा विधानसभेत या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. त्यांच्यानंतर शिवसेनेचे शाम सावंत यांनी सलग तीन वेळा आमदार होण्याचा मान मिळवला. शिवसेना आणि काँग्रेस या दोन पक्षांचा पारंपरिक मतदारसंघ म्हणूनही श्रीवर्धनची ओळख आहे.
मतदारसंघाच्या पुनर्रचनेत श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघात रोहा, माणगाव, तळा तालुक्यांमधील भाग जोडला गेल्याने गेल्या निवडणुकीत हा मतदारसंघ काँग्रेसकडून राष्ट्रवादीकडे आला. या वेळी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते सुनील तटकरे यांनी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. यात सुनील तटकरे यांना ६६ हजार १४१ मते मिळाली. तर शिवसेनेच्या तुकाराम सुर्वे यांना ५५ हजार २७० मते मिळाली होती. मतदारसंघातून निवडून आल्यावर आपल्या मंत्रिपदाचा वापर करून तटकरे यांनी मतदारसंघाची बांधणी केली.
मतदारसंघात या वेळी बहुरंगी लढत पाहायला मिळणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून रोह्य़ाचे नगराध्यक्ष अवधूत तटकरे, शिवसेनेकडून उपजिल्हाप्रमुख रवी मुंडे, भाजपकडून शिवसेना बंडखोर कृष्णा कोबनाक, काँग्रेसकडून उदय कठे, तर शेकापकडून अस्लम राऊत निवडणुक रिंगणात असणार आहेत. मात्र पक्षीय बलाबलाचा विचार केल्यास प्रमुख लढत ही राष्ट्रवादी आणि शिवसेना उमेदवारांमध्ये पाहायला मिळणार आहे.  
कोकणातील इतर कुठल्याही मतदारसंघाला मिळाला नसेल एवढा निधी तटकरे यांनी या मतदारसंघात आणला. पाच वर्षांत जवळपास साडेचारशे कोटींची कामे मतदारसंघात करण्यात आली. श्रीवर्धन येथे उपजिल्हा रुग्णालय, प्रशासकीय भवन, नगरपालिका इमारत, नगरपालिका शाळांच्या इमारती, समुद्रकिनाऱ्याचे सुशोभीकरण, मुलींसाठी एसएनडीटी महाविद्यालय, आयटीआय यांसारखी कामे पाच वर्षांत पूर्ण करण्यात आली. बाणकोट खाडीवरील पुलासाठी साडेतीनशे कोटींचा निधी नाबार्डकडून तटकरे यांनी पदरात पाडून घेतला. या विकासामुळे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मतदारसंघातून त्यांना चांगले मताधिक्य मिळाले होते.
पण गेल्या पाच वर्षांत श्रीवर्धन म्हसळा आणि तळा तालुक्यातील पायाभूत सुविधांचा विकास करण्यात तटकरे अपयशी ठरलेत. रस्ते, पाणी यांसारख्या मुलभूत समस्या आजही मतदारसंघातील अनेक भागांत पाहायला मिळतात. श्रीवर्धन तालुक्यातील अनेक गावांत एस.टी. पोहचत नसल्याची तक्रारही गावकरी करतात. याच मुद्दय़ांना हाताशी धरून राष्ट्रवादीची कोंडी करण्याचे प्रयत्न शिवसेनेने सुरू केले आहे.    शिवसेनेतून बंडखोरी करत संपर्क प्रमुख कृष्णा कोबनाक यांनी भाजपत प्रवेश केल्याने राष्ट्रवादीला फायदा होईल, असा कयास बांधला जातो. मात्र मतदारसंघात पक्ष संघटना बांधणी करणाऱ्या सुनील तटकरे यांच्या दोन्ही मुलांची गैरहजेरी अनेकांच्या भुवया उंचावते आहे. उमेदवारी जाहीर झाल्यापासून अनिकेत आणि अदिती तटकरे दोघेही मतदारसंघात फिरकले नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. एकूणच या निवडणुकीच्या अनुषंगाने सुनील तटकरे यांची राजकीय प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. मतदारसंघावर आपले वर्चस्व कायम राखण्यासाठी त्यांना शिवसेनेच्या कडव्या आव्हानाला सामोर जावे लागणार आहे.