वैद्यकीय, अभियांत्रिकी, आयआयटी शिक्षणासाठी प्रवेशपूर्व परीक्षा अट सुरू झाली आणि प्रात्यक्षिके अडगळीत गेली. प्रवेश मिळविण्यासाठी प्रात्यक्षिके नसल्याने प्रयोगशाळेतील विज्ञानाचे साहित्याची अक्षरश: अडगळ झाली आहे. शाळा, कनिष्ठ महाविद्यालयातील प्रयोगशाळेत विज्ञान प्रात्यक्षिकांबद्दल अनास्था वाढत आहे.
डॉ. सी. व्ही. रामन यांच्या शोधनिबंधास २८ फेब्रुवारी रोजी नोबेल मिळाल्याच्या निमित्ताने हा दिवस ‘राष्ट्रीय विज्ञानदिन’ म्हणून पाळण्याची प्रथा १९८७पासून सुरू झाली. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक वृत्ती निर्माण करण्यासाठी अनुभूती महत्त्वाची असते. त्यासाठी शालेय स्तरावर शिक्षणात प्रात्यक्षिकावर भर दिला जावा, अशी अपेक्षा शिक्षणतज्ज्ञांमधून व्यक्त होते. वैज्ञानिक जाणिवा विकसित करण्यासाठी परदेशात वैज्ञानिक संग्रहालये दिमाखात उभी केली जातात. त्याला भेट देणाऱ्यांची संख्याही वाढलेली आहे.
गेल्या काही वर्षांपासून वैद्यकीय, अभियांत्रिकी, आयआयटी शिक्षणासाठी प्रवेशपूर्व परीक्षा घेतली जाते. यासाठी प्रात्यक्षिक परीक्षा घेतली जात नाही. ही बाब विद्यार्थी, शिक्षक व पालक यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी प्रात्यक्षिक परीक्षांकडे डोळेझाक केली. एकेकाळी शाळा, कनिष्ठ महाविद्यालयात अद्ययावत प्रयोगशाळा असणे, उपकरणे असणे हे शाळांच्या उत्तम दर्जाचे लक्षण होते. आता लेखी परीक्षेतील गुणांनाच अधिक महत्त्व असल्याने पालकांनाही प्रात्यक्षिकाचा आपल्या पाल्यांना त्रास होतो, असे वाटायला लागले. मागणी तसा पुरवठा या धोरणानुसार प्रात्यक्षिक परीक्षेतील गुणांचे अनुदान २०वरून ३०वर गेले. त्यामुळे एखाद्या विद्यार्थ्यांला लेखी परीक्षा नाही दिली तरी पास होण्याची हमी परीक्षा मंडळ, महाविद्यालय व शाळांतून मिळू लागली. कोटय़वधी रुपये प्रयोगशाळा, कर्मचारी, उपकरणे यावर शासन खर्च करते, ते अक्षरश: पाण्यात जात आहेत. प्रयोगशाळेतील धूळही वर्षांनुवष्रे झटकली जात नाही. कागदोपत्री परीक्षा घेतल्याचे नाटक रचले जाते. परीक्षा मंडळाने गेल्या तीन-चार वर्षांपासून बाहेरचा परीक्षक ही कल्पना प्रात्यक्षिक परीक्षेसाठी बाद केली व शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनाच अंतर्गत परीक्षा घेण्याचे पूर्ण अधिकार दिले.
नामवंत महाविद्यालयातदेखील बारावी परीक्षेपूर्वी महिनाभर प्रात्यक्षिक परीक्षेच्या तयारीचे सोपस्कार पूर्ण केले जातात. या पद्धतीने विज्ञानासारख्या विषयाकडे पाहिले जात असेल तर पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमाकडे विद्यार्थी प्रवेश कशासाठी घेतील? वैज्ञानिक संशोधन करण्याकडे विद्यार्थ्यांचा कल कसा वाढेल? हा खरोखरच चिंतेचा विषय असल्याचे प्राचार्य अनिरुद्ध जाधव म्हणाले.