News Flash

सिद्धेश्वर यात्रेत नयनरम्य अक्षता सोहळा संपन्न

भाविकांच्या साक्षीने अक्षता सोहळा भक्तिमय व मंगलमय वातावरणात पार पडला.

सोलापूरचे ग्रामदैवत सिध्देश्वर यात्रेत शुक्रवारी अक्षता सोहळ्यासाठी उत्तर कसब्यातील हिरेहब्बू मठातून साडेसत्तावीस फूट उंचीच्या सर्व सात नंदीध्वजांची मिरवणूक काढण्यात आली. 

सोलापूरचे ग्रामदैवत सिध्देश्वर यात्रेच्या दुसऱ्या दिवशी शुक्रवारी दुपारी सिध्देश्वर मंदिर व तलाव परिसरात संमती कट्टय़ावर लाखो भाविकांच्या साक्षीने अक्षता सोहळा भक्तिमय व मंगलमय वातावरणात पार पडला. नऊशे वर्षांच्या ऐतिहासिक परंपरेनुसार चालत आलेल्या या यात्रेतील अक्षता सोहळा नेत्रांमध्ये साठवताना प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंदाची व धन्यतेची भावना दिसून आली. अक्षता सोहळा संपन्न होताच सिध्देश्वर महाराजांच्या जयजयकाराने संपूर्ण आसमंत दुमदुमून गेला.

बाराव्या शतकात श्रमाला प्रतिष्ठा देत व सामाजिक सुधारणा करीत, सोलापुरात वास्तव्य केलेले ग्रामदैवत सिध्देश्वर महाराजांच्या प्रत्यक्ष आयुष्यात घटनांवर आधारित दरवर्षी ही यात्रा भरते. योगीपुरूष सिध्देश्वर महाराजांची भक्ती करीत, त्यांच्याबरोबरच विवाह करण्याचा हट्ट एका कुंभारकन्येने धरला होता. तिला कितीही समजावून सांगितले तरी तिने आपला हट्ट कायम ठेवला होता. शेवटी सिध्देश्वर महाराजांनी त्या कुंभारकन्येला आपल्या योगदंडाबरोबर विवाह करण्याची अट घातली. ही अट आनंदाने मान्य करीत ती सौंदर्यवती कुंभारकन्या सिध्देश्वरचरणी लीन होऊन विवाहबध्द झाली. नंतर दुसऱ्या दिवशी तिने अग्निप्रवेश केला, अशी आख्यायिका सांगितली जाते. सिध्देश्वर महाराजांच्या या अद्भुत विवाह सोहळ्यावर आधारित सिध्देश्वर यात्रेत विविध धार्मिक कार्यक्रम होतात. सिध्देश्वर महाराजांनी आपल्या कार्यकाळात सोलापूरच्या पंचक्रोशीत प्रतिष्ठापना केलेल्या ६८ शिवलिंगांना तैलाभिषेक (यण्णीमज्जन) करून विवाह सोहळ्यात सहभागी होण्याचे आवाहन केले जाते. त्यानुसार यात्रेच्या पहिल्या दिवशी सिध्देश्वर महाराजांच्या योगदंडासह सात उंच नंदीध्वजांचा भव्य मिरवणूक सोहळा होऊन सर्व ६८ शिवलिंगांना प्रदक्षिणा घातली गेली.

त्यानंतर दुसऱ्या दिवशी शुक्रवारी अक्षता सोहळ्यासाठी उत्तर कसब्यातील हिरेहब्बू मठातून साडेसत्तावीस फूट उंचीचे सर्व सात नंदीध्वज मिरवणुकीने बाहेर पडले. नवरदेवाप्रमाणे सिध्देश्वर महाराजांच्या योगदंडासह नंदीध्वजांना हळद लावून आणि बाशिंग बांधून निघालेली ही मिरवणूक म्हणजे जणू साक्षात ग्रामदैवत सिध्देश्वर महाराजांच्या लग्नाची वरातच होती. पारंपरिक पध्दतीने या वरातीत रस्त्याच्या दुतर्फा असंख्य सुवासिनींनी महिलांनी नंदीध्वजांचे श्रध्दापूर्वक औक्षण केले. घराघरातून भाविकांनी आणलेले बाशिंग नंदीध्वजांना बांधले जात होते.

मिरवणुकीच्या संपूर्ण मार्गावर संस्कार भारतीच्या कलावंतांनी आकर्षक रांगोळीद्वारे कलाविष्कार घडविला. रांगोळीची लांबी खूप मोठी होती. ही रांगोळी पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. विजापूर वेशीत स्थानिक मुस्लिम बांधवांनी नंदीध्वजाचे स्वागत केले.

दुपारी पावणेदोनच्या सुमारास नंदीध्वज सिध्देश्वर मंदिर तलाव परिसरात पोहोचले, तेव्हा अक्षता सोहळ्याची उत्कंठा ताणली गेली होती. अक्षता सोहळा याची देही, याची डोळा पाहण्यासाठी असंख्य भाविक एक तास अगोदरच सिध्देश्वर मंदिर तलाव परिसरात संमती कट्टय़ावर मिळेल ती जागा पकडून बसले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 14, 2017 1:09 am

Web Title: siddheshwar yatra in solapur
Next Stories
1 थंडीने पिकांना उभारी
2 स्टेट बँक स्टाफ युनियनच्या मुंबईतील विश्रामगृह खरेदीत गैरव्यवहाराचा आरोप
3 ‘राजवाडी भाजी’ उपक्रमाचे दुसऱ्या वर्षांत पदार्पण
Just Now!
X