राज्यातील रक्तपेढ्यांमध्ये अवघा आठवडाभर पुरेल एवढाच रक्ताचा साठा आहे. यामुळे रुग्णालयातील शस्त्रक्रिया रद्द कराव्या लागतील हे लक्षात घेऊन दादर प्रभादेवी येथील सिद्धिविनायक मंदिर न्यासाने मुंबईतील सोसायट्यांमध्ये जाऊन रक्तदान शिबिरे आयोजित करण्याची योजना आखली आहे. दरम्यान, हे रक्तदान म्हणजे लोकांनी लोकांसाठी योजलेलं महायज्ञ असल्याचं मत सिद्धिविनायक न्यासाचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांनी व्यक्त केलं.

राज्यातील सर्वांनी जास्तीत जास्त रक्तदान करून आपण राज्यावर आलेलं संकट दूर करूया, असं आवाहन आदेश बांदेकर यांनी केलं आहे. एका मराठी वृत्तवाहिनीशी त्यांनी संवाद साधला. “१ एप्रिलपासून आम्ही सोसटींमध्ये जाऊन रक्त गोळा करणार आहोत. सुरूवातील एक गाडी काही ठिकाणी रक्तसंकलनासाठी जाणार आहे. त्यानंतर आरोग्यविभागाशी बोलून आणखी गाड्या वाढवण्याचा विचार करण्यात येईल. हे लोकांनी लोकांसाठी योजलेला महायज्ञ आहे. आपण हे काम सतत करत राहू. महाराष्ट्रातून आतापर्यंत अनेकांनी नावं नोंदवली आहेत. याची सुरूवात सुरूवात मुंबईपासून करणार आहोत. ज्या ज्या ठिकाणाहून नावं आली आहेत, ती नावं आणि त्यांचे संपर्क क्रमांक त्या त्या जिल्ह्यात पाठवत आहोत,” असंही त्यांनी नमूद केलं.

“आम्ही रक्तसंकलानासाठी विभागवार जाणार आहोत. एक रक्तदाता असेल तरी आमची गाडी जाईल किंवा अनेक असतील तरी गाडी जाईल. सुरूवातीला गरज पाहता ज्या ठिकाणी अधिक लोकांनी नावं नोंदवली त्यांच्याकडे आपण जाऊ. त्यानंतर पुढील प्रवास केला जाईल. काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले बाहेरचं वातावरण खराब आबे. पण घरातलं वातावरण चांगलं ठेवावं. करोनाला न घाबरता लोकांनी रक्तदान करावं,” असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं. ज्या लोकांना आमच्याशी संपर्क साधायचा आहे त्यांना इमेलद्वारेही संपर्क साधता येईल. त्यात त्यांनी पूर्ण नाव, वय, पत्ता, रक्तगट अशी माहिती द्यावी, असंही त्यांनी नमूद केलं.

राज्यातील रक्तपेढ्यांमध्ये अवघे १० ते १२ दिवस पुरेल एवढाच रक्ताचा साठा असल्याचे वृत्त ‘लोकसत्ता’ ने प्रसिद्ध केल्यानंतर त्याची तात्काळ दखल घेत सिद्धिविनायक मंदिर विश्वस्त न्यासाचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांनी सिद्धिविनायकाच्या माध्यमातून मुंबईतील सोसायट्यांमध्ये जाऊन रक्तदान शिबिरे आयोजित करण्याची योजना तयार केली. यासाठी ‘राज्य रक्त संक्रमण परिषदे’च्या डॉक्टरांशी संवाद साधला होता.

येत्या १ एप्रिल पासून ही रक्तदान योजना सुरु होणार असून सकाळी १० ते सायंकाळी ६ यावेळेत ०२२- २४२२४४३८ किंवा ०२२- २४२२३२०६ या नंबरवर सोसायटी पदाधिकाऱ्यांनी रक्तदान शिबिरासाठी सिद्धिविनायक न्यासशी संपर्क साधावा.