या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राज्यातील ३४ जिल्ह्य़ांना डायलेसिस सेंटर सुरू करण्यासाठी साडेतीन कोटी आणि जलयुक्त शिवार योजनेसाठी चौतीस कोटी रुपये देण्यात आले असल्याची माहिती मुंबई येथील सिद्धिविनायक मंदिर न्यासचे विश्वस्त प्रवीण नाईक यांनी दिली. सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात आरोग्य सुविधाअभावी होणारी गैरसोय रुग्णालय उभारून दूर करणार किंवा कसे? या प्रश्नावर नाईकांनी मात्र गप्प राहणे पसंत केले.

सिद्धिविनायक मंदिर न्यासाचे विश्वस्त प्रवीण नाईक सिंधुदुर्ग-सावंतवाडीचे सुपुत्र आहेत. त्यांनी सावंतवाडीत नगरपालिका मुख्याधिकारी विजयकुमार द्वासे,  श्री पंचम खेमराज महाविद्यालय व बांदा येथील खेमराज विद्यालयास भेट दिल्यावर ते बोलत होते.

सिंधुदुर्गात रुग्णांची होणारी गैरसोय त्यांच्या लक्षात पत्रकारांनी आणून देत पायाभूत सुविधाअभावी रुग्णांची हेळसांड होत आहे, त्यामुळे एखादे रुग्णालय उभारले जाईल का? त्याला सिद्धिविनायक ट्रस्टच्या माध्यमातून साथ द्याल का? या प्रश्नावर प्रवीण नाईक शांत राहिले. मात्र समूहाने तसा प्रकल्प राबविल्यास ट्रस्ट सहकार्य करेल असे म्हणाले.

सिद्धिविनायक मंदिर ट्रस्ट शासनाच्या मार्गदर्शनाखाली काम करत आहे. विश्वस्तांनी प्रकल्प मंजूर केला तरी कायदामंडळ व मुख्यमंत्र्यांनी मान्यता द्यावी लागते असे प्रवीण नाईक म्हणाले. सिद्धिविनायक मंदीरसमोर पाच माळ्यांची इमारत उभी राहिली आहे त्यात डायलेसिस सेंटर आहे. एका वेळच्या डायलेसिससाठी २५० रुपये घेतले जातात. वाचनालयाचा ७५० विद्यार्थी फायदा घेत आहेत असे सांगून मुक्या-बहिऱ्या पाच वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी शस्त्रक्रिया करावी लागल्यास एक लाख रुपये न्यास मदत करेल असे नाईक म्हणाले.

आत्महत्या करणाऱ्या पालकांच्या मुलांना ११वी ते १५वी पर्यंतच्या शिक्षणासाठी शासनाच्या मंजुरीमुळे शिष्यवृत्ती देण्यात येत आहे. न्यासकडे २८० कोटींचे डिपॉझिट आहे असे सांगताना नाईक म्हणाले, राज्यातील ३४ जिल्ह्य़ांना एक कोटीप्रमाणे ३४ कोटी जलयुक्त शिवारसाठी मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेने दिले गेले आहेत. आज कॉलेजच्या ११वी ते १५वीपर्यंतच्या शिक्षणासाठी पुस्तके पुरविली जात आहेत असे ते म्हणाले.

कॅलिफोर्नियात गणपती मंदिर आहे. न्यूजर्सी न्यूयॉर्कमध्ये सहा एकर जमीन घेऊन मल्टिपर्पज हॉल, पंचवीस निवासस्थाने असा प्रकल्प उभारून अमेरिकेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना व गरजूंना मदतीचा हात दिला जाणार आहे, असे नाईक म्हणाले. सिद्धिविनायक न्यासच्या माध्यमातून कोकण, मुंबई, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र व विदर्भ अशा विभागांत वेगवेगळी मदत केली जाते. जालन्यात धरणासाठी आठ कोटी दिले असल्याचे ते म्हणाले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकार सकारात्मक विचारातून काम करत आहेत असे नाईक म्हणाले. जलयुक्त शिवार, डायलेसिस सेंटरला राज्यात न्यासाने आर्थिक मदत दिली आहे. त्याची पाहणीदेखील करण्यात येते, असे प्रवीण नाईक म्हणाले.

More Stories onमदत
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Siddhivinayak trust helping for dialysis center and jal shivar
First published on: 07-01-2016 at 00:58 IST