News Flash

रुग्णांवर ‘रेमडेसिविर’चा दुष्परिणाम

पालघर, रायगड, पुण्यात तक्रारी; वापर थांबविण्याचे कंपनीचे निर्देश 

प्रातिनिधिक छायाचित्र

‘हेटेरो हेल्थकेअर’ या कंपनीकडून पुरवठा करण्यात आलेल्या रेमडेसिविर औषधामुळे त्रास होत असल्याच्या तक्रारी गुरुवारी राज्यातील अनेक भागांतून आल्या.

पालघरमध्ये बुधवारी पुरवठा केलेल्या रेमडेसिविरच्या ६५० कुप्यांचा वापर न करण्याचे कंपनीने जाहीर केले होते. पण हा आदेश मिळण्यापूर्वीच खासगी रुग्णालयांनी २३२ रुग्णांवर रेमडेसिविर औषधाचा वापर केला. त्यामुळे १३ रुग्णांना त्रास झाला. शरीराला कंप सुटत असल्याचे या रुग्णांनी सांगितले. रायगडमध्ये रेमडेसिविरच्या ५०० कुप्या देण्यात आल्या  होत्या. त्यापैकी १२० कुप्या रुग्णांना देण्यात आल्या. यातील ९० जणांना इंजेक्शन घेतल्यावर त्रास जाणवला. तर पुण्यात दोन हजार १५५ कुप्या वितरित झाल्या होत्या. त्यातील काही कुप्या रुग्णांसाठी वापरण्यात आल्यानंतर त्यांना त्रास झाला.

रायगड जिल्ह््यात ‘हेटेरो हेल्थ केअर’ कंपनीकडून वितरित करण्यात आलेल्या रेमडेसिविर इंजेक्शनचा वापर तात्काळ थांबविण्याचे आदेश अन्न औषध प्रशासनाने जारी केले आहेत. तर या इंजेक्शन्सचा पुरवठा पुणे शहरासह जिल्ह््यात तूर्त थांबवण्यात आला असून या तक्रारीबाबत अन्न व औषध प्रशासनाकडून (एफडीए) कंपनीकडे स्पष्टीकरण मागवण्यात आले आहे.

पालघरमध्ये हेटेरो कंपनीच्या संचालकांनी पत्राद्वारे हे उत्पादन तांत्रिक कारणास्तव रोखण्यात आल्याचे प्रसिद्ध केले. असे असताना जिल्ह््यातील २३२ रुग्णांना हे औषध दिले गेल्याचे निदर्शनास आले. पालघरमधील सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याचे पालघरचे उपजिल्हाधिकारी तसेच रेमडेसिविर इंजेक्शनचे वितरण व्यवस्थेचे समन्वयक सुरेंद्र नवले यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले. ‘हेटेरो हेल्थकेअर’ व्यवस्थापनाने याबाबतची अधिकृत भूमिका स्पष्ट केलेली नाही. तर तूर्त या इंजेक्शनचा वापर रोखण्यात आल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र केळकर यांनी सांगितले.

झाले काय?

हेटेरो हेल्थकेअर कंपनीच्या औषधाचे पालघरमध्ये वितरण झाले होते. तांत्रिक कारणामुळे या औषधाचा वापर करू नका, अशी सूचना कंपनीने केली होती. मात्र रेमडेसिविरचा तुटवडा असल्याने जिल्ह््यातील रुग्णालयांनी हे औषध तातडीने रुग्णांना दिले. त्यात २३२ रुग्णांपैकी १३ जणांना अंग थरथरण्याचा त्रास काही काळ जाणवला. रायगडमधील ९० जणांना त्रास झाला, तर पुण्यातही काही विभागांतून या औषधामुळे रुग्णांवर दुष्परिणाम झाल्याचे निदर्शनास आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 30, 2021 12:59 am

Web Title: side effects of remedesivir on patients complaints in palghar raigad pune abn 97
Next Stories
1 बाधितांच्या नमुन्यांचे आता जनुकीय क्रमनिर्धारण
2 पुणे : ससून रूग्णालयातील बंद पडलेले २१ व्हेंटिलेटर मनपाकडून कार्यान्वित
3 “राजीव सातव यांची प्रकृती स्थिर”; राज्यमंत्री विश्वजीत कदम यांची माहिती
Just Now!
X