पालघरमधील मत्स्य उत्पादनात प्रचंड घट; निर्यातीवरही परिणाम

नीरज राऊत, पालघर

प्रचंड महाग मिळूनही मत्स्यप्रेमींना सुखावणाऱ्या आणि हव्याहव्याशा वाटणाऱ्या पापलेटच्या उत्पादनामध्ये प्रचंड मोठी घट झाली असून या माशांच्या प्रजनन काळात मासेमारीबंदीची कठोर अंमलबजावणी न झाल्यास येत्या काही वर्षांमध्ये पापलेट दुर्लभ होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. निर्यातक्षम पापलेटची राज्यासह जगभरात निर्यात करणाऱ्या एकटय़ा पालघरजवळील सातपाटी गावातील पापलेट उत्पादनात गेल्या हंगामात १९० टनांची घट झाली आहे.

मत्स्यसंवर्धनासाठी प्रजनन काळात मासेमारीबंदी केली जाते. मात्र फायद्यासाठी त्या काळातही  ट्रॉलर व पर्ससिन पद्धतीने नियमांचे उल्लंघन करून पापलेट मिळवण्यासाठी बेसुमार मासेमारी केली जात आहे. अनेक कमी आकारांच्या पापलेट पिल्लांची बाजारांमध्ये विक्री होत असल्याचे दिसून आले आहे. यामुळे पापलेट उत्पादनावर परिणाम होतो म्हणूनच प्रजनन काळात मासेमारीबंदीची कठोरपणे अंमलबजावणी व्हावी, अशी मच्छीमारांची मागणी आहे.

सातपाटीमधील मासेमारी..

१ जून ते ३१ जुलै यादरम्यान महाराष्ट्र राज्याच्या सागरी हद्दीमध्ये मासेमारीबंदी केली जाते. १ ऑगस्टनंतर नारळी पौर्णिमा किंवा हवामानाची अनुकूलता पाहून मासेमारीचा नवीन हंगाम सुरू होतो. मासेमारीच्या पहिल्या हंगामामध्ये म्हणजेच ऑगस्टपासून ते ऑक्टोबर, नोव्हेंबर या महिन्यांदरम्यान पापलेटची मासेमारी विशिष्ट आसाच्या जाळ्याने केली जाते.  सातपाटी येथील मच्छीमारांच्या दोन सहकारी संस्था आहेत. यात ‘द सातपाटी फिशरमेन्स सर्वोदय सहकारी सोसायटी लिमिटेड’ या संस्थेअंतर्गत सुमारे १३५ बोटी, तर ‘सातपाटी मच्छीमार विविध कार्यकारी सहकारी संस्था मर्यादित’ या संस्थेच्या सुमारे ७५ बोटी मासेमारी करतात. या दोन्ही सहकारी सोसायटय़ांमार्फत मासेमारी हंगामाच्या आरंभी पापलेट विक्रीचे दर निश्चित केले जातात. हे दर मासेमारी हंगामाच्या आरंभापासून ते जानेवारी महिन्यापर्यंत व नंतर फेब्रुवारी ते हंगाम संपेपर्यंत अशा पद्धतीने निश्चित केले जातात.

 येथील माशांनाच मागणी का?

पापलेट हा मोठय़ा मागणीचा मासा गिलनेट व डोलनेट अशा दोन पद्धतीने पकडला जातो. पापलेट पाण्याच्या पृष्ठभागावर तिरका (तिरप्या) पद्धतीने वाहत असतो. त्याला पाच ते सहा इंच इतका आस असलेल्या गिलनेट पद्धतीच्या जाळ्याने सातपाटी भागाचे मच्छीमार पकडतात. या पद्धतीत माशाच्या श्वास घ्यायचा गिल (कल्ले) हा भाग जाळ्यांमध्ये अडकला जातो, यामुळे पापलेटच्या अंगावरील खवले अखंड राहून माशाचा ताजेपणा कायम राहतो, असे येथील मच्छीमारांचे म्हणणे आहे. त्याचबरोबरीने लहान आकाराचे पापलेट या प्रकारच्या जाळ्यांमधून सहजपणे निघून जात असल्याने मध्यम व मोठय़ा आकाराचे मासेच पकडले जातात. याउलट डोलनेट पद्धतीच्या मासेमारीमध्ये लहान आस असलेल्या जाळ्याच्या आधारे प्रवाहासोबत वाहून येणाऱ्या माशांना एकत्रितपणे पकडले जाते. प्रवाहासोबत वाहणाऱ्या जाळ्यामध्ये अडकलेल्या अनेक प्रकारच्या या माशांचे एकमेकांशी घर्षण होत असल्याने अशा पद्धतीने पकडलेल्या माशांवर असलेले खवले निघून जातात. यामुळे निर्यातीसाठी सातपाटी भागात गिलनेट पद्धतीने पकडल्या जाणाऱ्या माशांना विशेष मागणी आहे.

वर्ष                 सर्वोदय सोसायटी    मच्छीमार सोसायटी      एकूण किलो

२०१४-१५       ३,१३,८६९                   १६९१०१                      ४८२९४०

२०१५-१६       ९३,२७७                       ६५४५४                        १५८७३१

२०१६-१७       १,९९,७५१                    ९२९१०                        २९२६६१

२०१७-१८       ३,३५,१२८                    १६,१९८८                     ४९७११६

२०१८-१९       २,०४,३१३                     ८८६०४                        २९२९१७

नक्की होतेय काय?

सातपाटी येथील पापलेट (सरंगा) मासेमारीमध्ये प्रसिद्ध असून येथील पापलेट मोठय़ा प्रमाणात निर्यात केला जातो. येथे आकाराने मोठे आणि गुणवत्तेच्या दृष्टीने उत्तम पापलेट मिळतात.  ५०० ग्रॅमहून अधिक वजनाच्या माशाला ‘सुपर सरंगा’ असे संबोधले जाते. मात्र गेल्या काही वर्षांपासून पापलेट उत्पादनामध्ये प्रचंड घट होत असल्यामु़ळे स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत प्रचंड दाम मोजूनही येथील पापलेटची निर्यात कमी होऊ लागली आहे.

ट्रॉलर व पर्ससीन पद्धतीने केल्या जाणाऱ्या मासेमारीमुळे पापलेटच्या उत्पादनात मोठय़ा प्रमाणात घट झाली आहे. गेल्या दहा ते पंधरा वर्षांपूर्वी मिळणाऱ्या या माशाच्या तुलनेत सध्याची मिळकत खूप कमी आहे. मासेमारी व्यवसाय टिकून राहण्यासाठी केंद्र सरकारने सध्या काही नवीन धोरणात्मक निर्णय घेतले असून त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी होणे अपेक्षित आहे. सातपाटी येथे मिळणाऱ्या पापलेटला (सरंगा) आंतरराष्ट्रीय बाजारात विशेष मागणी असून अनेक निर्यातदार सातपाटी येथे येऊन पापलेटची खरेदी करतात.

– नरेंद्र पाटील, अध्यक्ष, नॅशनल फिश वर्कर फोरम

बोंबीलही कडाडले

उरण : पावसाळ्यात मांसाहारी मंडळींकरिता बोंबील ही मेजवानी असते. मात्र गेल्या काही दिवसांपासून मासळी बाजारात या हंगामातील बोंबील अगदीच थोडय़ा प्रमाणात दाखल होऊ लागले आहेत. नगाला २० रुपयांवरून ४० रुपये अशी त्याची विक्री होत असल्याने मासळीप्रेमी  अवाक् झाले आहेत.