पद्मश्री विखे पाटील यांच्या मायेच्या सावलीत आपण वाढलो ते क्षण आपण कधीही विसरू शकत नाही, असे सांगत सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला.
सिक्कीमचे राज्यपाल पाटील यांचा रविवारी प्रवरा शैक्षणिक, सांस्कृतिक व औद्योगिक समूहाच्या वतीने लोणी येथे सत्कार करण्यात आला. या सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते. या वेळी ज्येष्ठ नेते, माजी खासदार बाळासाहेब विखे, पायरेन्सचे अध्यक्ष एम. एम. पुलाटे, संचालक ए. पी. उंडे, विखे कारखान्याचे अध्यक्ष डॉ. भास्करराव खर्डे, प्राचार्य डॉ. एस. आर. वाळुंज, प्रवरा अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शशांक दळवी आदी उपस्थित होते.
सावलीत रोप येत नाही, असे अनेक जण म्हणतात. परंतु आपण या भूमीत पद्मश्रींची मायेची ऊब व सावलीत वाढलो. आजही माझ्या घरात त्यांचा फोटो आहे. सरकारी अधिकारी म्हणून अनेक वेळा आपण चांगल्या कामासाठी त्यांच्यामागे दडलो. कारखान्याला ऊस यावा म्हणून आपण संगमनेरचे प्रांताधिकारी असताना आश्वीमध्ये स्वत: उभे राहून रस्ता तयार केला. तसेच संगमनेर कारखान्याचे कार्यकारी संचालक म्हणून आपण काम केल्याची आठवणही त्यांनी सांगितली. शेतकऱ्यांनी छोटेमोठे वाद विसरून विधायक कामाकडे वळावे. समाजाला सावली देण्याचे काम पद्मश्री विखे यांनी केले. तीच सावली देण्याचे काम बाळासाहेब करीत आहे. या बाळकडूमुळे मंत्री राधाकृष्ण समाजाचे चांगल्याप्रकारे नेतृत्व करीत आहे. शरद पवारांनी दिलेल्या प्रत्येक संधीचे आपण सोने केले आहे, असे सांगत पाटील यांनी अनेक जुन्या आठवणीतील वेगवेगळे पैलू उलगडल्याने उपस्थितांनीही त्यांना मनापासून दाद दिली.
बाळासाहेब विखे म्हणाले, माझ्या सामाजिक जीवनात पाटील यांचे योगदान मोठे असून, त्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्याबरोबरच समाजात चांगले काम केल्याने लोकांनी त्यांना डोक्यावर घेतले. विरोधी पक्षांनीही त्यांच्या कामाची स्तुती केली. त्यामुळे ते अजातशत्रू म्हणूनच ओळखले जातात.
 विखे यांनीही पाटील यांच्या जुन्या आठवणी सांगितल्या. पुलाटे यांनी आभार मानले.
छाया ओळी-
सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील यांचा रविवारी लोणीमध्ये ज्येष्ठ नेते बाळासाहेब विखे यांच्या हस्ते प्रवरा उद्योग समूहाच्या वतीने सत्कार करण्यात आला.