23 November 2017

News Flash

गडकरी वाडा, संघ कार्यालयात स्मशानशांतता..

सर्वसामान्य कार्यकर्त्यांपासून तर भारतीय जनता पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्षपदाचा टप्पा गाठणाऱ्या नितीन गडकरी यांच्या स्वागतासाठी

खास प्रतिनिधी, नागपूर | Updated: January 24, 2013 2:23 AM

सर्वसामान्य कार्यकर्त्यांपासून तर भारतीय जनता पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्षपदाचा टप्पा गाठणाऱ्या नितीन गडकरी यांच्या स्वागतासाठी बरोबर तीन वर्षांपूर्वी २० डिसेंबर २०१२ रोजी अवघा विदर्भ उपराजधीत लोटला असताना बुधवारी मात्र त्यांच्या निवासस्थानी आणि संघ बिल्डिंग परिसरात शांतता पसरलेली होती. प्रत्येक कार्यकर्ता आणि स्वयंसेवक असे झालेच कसे? असा प्रश्न उपस्थित करून पक्ष नेतृत्वावर नाराजी व्यक्त करीत होता.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत घडलेल्या नितीन गडकरी यांनी सार्वजानिक बांधकाम मंत्री म्हणून काम करताना केलेल्या विकासकामांमुळे ते ‘विकास पुरुष’ अशी प्रतिमा निर्माण करण्यात यश मिळविले होते. त्यानंतर प्रदेशाध्यक्षपद सांभाळताना त्यांनी महाराष्ट्रात स्वत:चे सक्षम आणि संघटनात्मक नेतृत्व उभे केले. त्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पाठबळामुळे गडकरी यांची भाजपचे अध्यक्ष म्हणून निवड झाल्यानंतर त्यांना राष्ट्रीय पातळीवर काम करण्याची संधी मिळाली. नागपूर शहराला प्रथमच गडकरी यांच्या रुपाने राष्ट्रीय नेतृत्व मिळाले होते. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यानंतर २० डिसेंबर २००९ ला राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून उपराजधानीत आले त्यावेळी त्यांचे ‘न भूतो न भविष्यती’ असे स्वागत करण्यात आले होते. जागोजागी स्वागत कमानी, मोठे फलक, चौकाचौकात कार्यकर्त्यांची गर्दी, भगवे आणि पक्षाचे झेंडे, ठिकठिकाणी लावण्यात आलेले तोरणांनी शहर सजले होते. जनसंघाच्या वृद्ध कार्यकर्त्यांपासून भाजपमधील ‘हायटेक’ तरुण कार्यकर्त्यांपर्यंत सारेच त्यांच्या स्वागताला लोटले होते. एवढेच नव्हे तर गडकरी व्यक्तिश: ज्या संघटना, संस्थांशी जुडलेले होते त्यांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सुद्धा गडकरींच्या स्वागतासाठी त्यावेळी एकत्र आले होते.
गडकरी यांची अध्यक्षपदाची पहिली टर्म संपल्यानंतर दुसऱ्यांदा पुन्हा राष्ट्रीय अध्यक्ष होतील अशी प्रत्येक कार्यकर्ता आणि सामान्य नागरिकाला अपेक्षा होती. त्यानुसार उपराजधानीत त्यांचे जंगी स्वागत करण्याची तयारी कार्यकर्त्यांनी केली असतानाच मंगळवारी रात्री ९ वाजेनंतर सारे चित्रच बदलले. गडकरींनी राष्ट्रीय अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याच्या ब्रेकिंग न्यूज वृत्तवाहिन्यांवर झळकू लागल्या आणि उपराजधानीतील पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि गडकरी यांच्यावर प्रेम करणारा प्रत्येक लहान-सहान कार्यकर्ता एकाएकी शांत झाला.
राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यानंतर गडकरी यांच्यावर पूर्ती उद्योग समूहावरून आरोप करण्यात आले त्यावेळी विदर्भातील प्रत्येक कार्यकर्ता गडकरींच्या पाठिशी उभा झाला होता. या काळात गडकरी यांनी शक्तिप्रदर्शन करण्यासाठी अनेक मेळावे घेतले. नागपूर लोकसभा मतदारसंघातून २०१४ ची लोकसभा निवडणूक लढणार असल्यामुळे स्थानिक पदाधिकारी कामाला लागले होते. या सर्व घडामोडीमध्ये गडकरी यांनी राजीनामा दिला आणि भाजप आणि संघ परिवारात नाराजीचा सूर उमटला. दिल्लीमध्ये आज सकाळी भारतीय जनता पक्षाच्या संसदीय मंडळाच्या बैठकीत पक्षाचे ज्येष्ठ नेते राजनाथसिंग यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाल्याचे निश्चित झाल्यावर दिल्लीतील भाजप मुख्यालय आणि राजनाथसिंग यांच्या उत्तप्रदेशमधील निवासस्थानी जल्लोशाचे वातावरण होते तर ‘माजी’ अध्यक्ष गडकरी यांच्या नागपुरातील महालमधील वाडय़ावर तसेच शहर भाजपच्या टिळक पुतळा आणि धंतोलीच्या कार्यालयात मात्र शांतता होती. नेहमीच चहल पहल असलेल्या गडकरी वाडय़ावर कार्यकर्त्यांची आणि भेटायला येणाऱ्यांची नेहमी दिसणारी रीघ जाणवली नाही. गडकरी कुटुंबातील सदस्य आणि सुरक्षेला असलेले कर्मचारीही बोलण्याच्या मनस्थितीत नव्हते. महाल आणि रेशीमबाग परिसरातील संघ कार्यालय परिसरातही अशीच स्थिती होती. संघाच्या प्रभात शाखांमध्ये स्वयंसेवकांमध्ये गडकरी यांच्या राजीनाम्याचीच चर्चा होती.

First Published on January 24, 2013 2:23 am

Web Title: silence at nitin gadkari house
टॅग Nitin Gadkari