04 March 2021

News Flash

सांगलीत उमेदवारीबाबत भाजपमध्ये वादळापूर्वीची शांतता!

खदखदीचे रूपांतर बंडखोरीत होऊ न देण्याचे ‘दादां’पुढे आव्हान

(संग्रहित छायाचित्र)

खदखदीचे रूपांतर बंडखोरीत होऊ न देण्याचे ‘दादां’पुढे आव्हान

दिगंबर शिंदे, सांगली

विधानसभा निवडणुकीचे वेध आता सर्वच राजकीय पक्षांना लागले आहेत. सत्ताधारी भाजपमध्ये वरवर शांतता भासत असली तरी आत जोरदार घुसळण सुरू आहे. जिल्हय़ात शिवसेनेच्या एका आमदारासह युतीचे पाच आमदार आहेत. जिल्हा परिषदेची सत्ता हाताशी असल्याने अख्ख्या जिल्हय़ातील आठही जागा युतीला मिळाव्यात यासाठी एकीकडे पक्षीय पातळीवर मोच्रेबांधणी सुरू असली तरी काहींनी वंचितचा पर्याय मनी ठेवला असल्याने ही खदखद कशी पेल्यातच राहील, याची काळजी प्रदेशाध्यक्ष म्हणून जबाबदारी आलेले कोल्हापूरचे ‘दादा’ कशी घेतात यावर राजकीय समीकरणे अवलंबून राहणार आहेत.

भाजपकडे हक्काच्या असलेल्या चार मतदारसंघापैकी मिरज वगळता अन्यत्र पक्षांतर्गत खदखद मोठय़ा प्रमाणावर सुरू आहे. जतमध्ये तर ही खदखद  बंडखोरीच्या पातळीवर आताच पोहोचली आहे, तर तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघात खुद्द खासदारांच्या समर्थकांकडूनच या असंतोषाला फोडणी देण्याचे उद्योग सुरू आहेत. विशेष म्हणजे या असंतोषावर वेळीच रामबाण इलाज न करता खासदार संजयकाका पाटील यांचे मौन बरेच सूचक असल्याचा दाखला समर्थकांकडून दिला जात आहे.

जतमध्ये विद्यमान आमदार विलासराव जगताप यांना विरोधकांपेक्षा स्वपक्षीयाकडूनच धोका निर्माण झाला आहे. जिल्हा परिषदेतील शिक्षण व आरोग्य सभापती तमणगोडा रवी-पाटील यांनीही जोरदार मोच्रेबांधणी केली असून लोकसभा निवडणूक प्रचारावेळीच त्यांनी केलेला भाजपचा प्रचार हा खासदारकीसाठी कमी आणि स्वत:साठी जादा होता, तर बाजार समितीच्या माध्यमातून सत्तेच्या जवळपास पोहोचलेले प्रकाश जमदाडे यांनीही दोघांच्या वादात संधी मलाच मिळणार, असा प्रचार सुरू केला असून संघ परिवारातील डॉ. रवींद्र आरळी यांनाही आमदारकीची स्वप्ने पडू लागली आहेत.

सांगली मतदारसंघामध्ये सुधीर गाडगीळ यांना पर्याय कोण, असा प्रश्न कालपरवापर्यंत उपस्थित केला जात होता. मात्र पडद्याआडून माजी आमदार दिनकर पाटील यांनी वाढदिवसाच्या निमित्ताने केलेली जाहिरातबाजी आणि महापालिकेच्या माध्यमातून सुरू केलेली पेरणी विधानसभेसाठीच असल्याचे मानले जाते आहे, तर निष्ठावंत गटाकडून स्वीकृत नगरसेवक पदाची संधी देऊन महापालिकेवर भाजपचा अंकुश राखण्याचे काम करणारे शेखर इनामदारही आमदारकीच्या उमेदवारीवर लक्ष ठेवून आहेत. त्यांचे आणि गाडगीळ यांचे मत्रीचे संबंध सर्वश्रुत असले तरी सत्तेच्या डावात सर्व काही माफ असते. महापालिकेतील सत्तांतर आणि लोकसभा निवडणुकीची मोच्रेबांधणी आपणच केली असल्याचे सांगत इनामदारही गुडघ्याला बािशग बांधून बसले आहेत, तर जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद मिळाले नाही, ऐन वेळी खासदार संजयकाका पाटील यांनी माघार घेतली म्हणून नाराज असलेले शिवाजी डोंगरे भाजपमध्ये असले तरी त्यांचे हितसंबंध वंचित आघाडीशी जुळले आहेत.

तासगावमध्ये अजितराव घोरपडे यांना आमदार करण्याच्या बोलीवर संजयकाकांनी लोकसभेसाठी मदत घेतली. मात्र संसदेचे अधिवेशन सुरू असल्याने खासदार दिल्लीत असल्याची संधी साधून समर्थकांनी काकांच्या पत्नी ज्योतीताई पाटील यांचे नाव विधानसभेसाठी चच्रेत आणले. आबांच्या पत्नी सुमनताई आणि ज्योतीताई यांच्यातच विधानसभेसाठी लढत होईल असा प्रचार समाजमाध्यमातून होत आहे. याची दखल भाजपने घेतली नसली तरी आज ठिणगी असली तरी याचा वणवा व्हायला वेळ लागणार नाही.

यामुळे भाजपची वाटचाल वेगाने काँग्रेसीकरणाकडे सुरू आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. उमेदवारी मागणे चुकीचे आहे असे याचे समर्थन पक्षाकडून होत असले तरी मतभेदाची दरी रुंदावत चालली आहे हे मान्यच करावे लागेल. यामागे वेगवेगळी कारणे असली तरी या मतभेदाला खतपाणी मिळण्याची विरोधकाकडून सुतराम शक्यता दिसत नाही. कारण काँग्रेस, राष्ट्रवादी या पक्षांतील कार्यकर्त्यांना पक्षांतराची लागण महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीतच झाली आहे.

राज्याचे नेतृत्व करणारे माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या पश्चात जिल्हय़ात काँग्रेसची कमांड सांभाळणारे डॉ. पतंगराव कदम यांचे निधन झाल्यानंतर पक्षाला एकमुखी आणि नैतिक दबाव टाकणारे नेतृत्वच उरले नसल्याने एके काळी बालेकिल्ला असलेला काँग्रेस आज नेतृत्वाच्या शोधात आहे. नेतृत्व करण्यासाठी दुसरी फळी मदानात आली असली तरी ही पिढी सत्तेच्या माजघरातच लहानाची मोठी झाली असल्याने सामान्य माणसाची नाळ अद्याप जुळली आहे असे वाटत नाही. विश्वजित कदम यांच्याकडे काँग्रेसवर प्रेम करणारे आशाळभूतपणे पाहत होते, मात्र त्यांनी आपले कार्यक्षेत्र केवळ कडेगावपुरतेच मर्यादित ठेवले असल्याचे दिसत असल्याने सामान्यांना फारशी आशाही उरली नाही. पतंगराव कदम, आर. आर. आबा यांच्यामुळे यापूर्वी कधीच नेतृत्वाची पोकळी जिल्हय़ाला भासली नव्हती, आता मात्र ती प्रकर्षांने भासत आहे. संधी असूनही विश्वजित कदम यांनी स्वत:ला मतदारसंघातच कोंडून घेतले असल्याने जिल्हय़ाच्या राजकारणात नेतृत्वाची पोकळी अधिकच मोठी भासत आहे.

नव्या पिढीतील वसंतदादांचे नातू विशाल पाटील यांच्यात वकूब आहे, वक्तृत्व आणि कर्तृत्वही आहे. मात्र त्यांनाच स्वत:च्या महत्त्वाकांक्षेची भुरळ पडली आहे असे मानले जाते. महापालिका निवडणुकीत चार-दोन नगरसेवक आणण्याचे त्यांचे प्रयत्न यशस्वी ठरले नसले तरी लोकसभा निवडणुकीत त्यांनी आपली ताकद दाखवून देण्याचा प्रयत्न केला. पहिल्यांदाच सार्वजनिक निवडणुकीत उतरून त्यांनी घेतलेले मतदान निश्चितच पुढची राजकारणाची दिशा दाखविणारे होते, मात्र या संधीचा लाभ घेण्याऐवजी त्यांनी काही काळ मौन व्रत स्वीकारल्याने सामान्य काँग्रेसजन संभ्रमात आहेत.

एके काळी कोल्हापूरकरांना राजकीय पदासाठी सांगलीच्या नेत्याकडे आशाळभूतपणे यावे लागत होते. आता मात्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष कोल्हापूरच्या दादांना मिळाल्याने अख्खी सांगली कोल्हापूरला खेटे घालून पुण्य पदरी बांधण्याचा प्रयत्न करीत आहे. या खेटय़ांमुळे काही प्रसाद पदरी पडतो का, याची विवंचना नव्याने पक्षात डेरेदाखल झालेल्यांना जशी लागली आहे तशीच विवंचना पक्षप्रवेशासाठी दारी येणाऱ्यांनाही आहे. या गर्दीत निष्ठावंत मात्र शक्तिकेंद्रे बळकटीकरण, पक्षांची विचारधारा विस्तारणे या कामात धन्यता मानत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 3, 2019 4:02 am

Web Title: silence in bjp over candidate for assembly elections in sangli zws 70
Next Stories
1 दिलीप गांधी यांच्यासह भाजपच्याही प्रतिमेला तडा
2 शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी शिवसेनेचा लढा
3 महाभरती बंद नाही, चांगल्या लोकांचे स्वागतच!
Just Now!
X