सोलापूर शहर व जिल्ह्य़ातील काँग्रेस पक्ष संघटनेतील मरगळ दूर करून नवा उत्साह निर्माण करण्यासाठी पक्षाचे नेते, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी शनिवारी दुपारी जुळे सोलापुरातील टाकळी मंगल कार्यालयात पक्ष कार्यकर्त्यांच्या बैठका घेतल्या. या वेळी आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीच्या दृष्टीने सोलापूर शहर मध्य व दक्षिण सोलापूर या दोन मतदारसंघातील स्थितीचा आढावाही शिंदे यांनी घेतला.
दरम्यान, मागील २००९ सालच्या विधानसभा निवडणुकीत सोलापूर शहर उत्तरमध्ये पराभूत झालेले पालिका सभागृह नेते महेश कोठे यांच्या विरोधात पक्षविरोधी कारवाया केल्याप्रकरणी शिस्तभंगाच्या कारवाईची ‘कारणे दाखवा’ नोटीस प्रदेश पक्षश्रेष्ठींनी बजावल्याच्या पाश्र्वभूमीवर सुशीलकुमार शिंदे यांनी घेतलेल्या या आढावा बैठकीकडे सर्वाचे लक्ष वेधले होते. परंतु या बैठकीकडे महेश कोठे यांनी पाठ फिरवून शिंदे यांची भेट न घेता सोलापूरबाहेर निघून जाणे पसंत केल्याचे सांगण्यात आले. मात्र या बैठकीला कोठे यांचे वडील तथा पक्षाचे स्थानिक नेते विष्णुपंत कोठे यांनी आवर्जून उपस्थिती लावली होती. एकंदरीत या बैठकीतील वातावरण वादळापूर्वीची शांतता असल्याचे राजकीय जाणकारांचे म्हणणे आहे.
सुशीलकुमार शिंदे यांचे स्थानिक राजकारण पाहणारे विष्णुपंत कोठे यांच्याबरोबरचे शिंदे यांचे राजकीय संबंध मागील काही वर्षांपासून दुरावले असून उभयतांमध्ये शीतयुद्ध चालल्याचे मानले जात आहे. गेल्या २५-३० वर्षांपासून महापालिकेचा कारभार सांभाळणारे कोठे यांच्याविरोधात आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांचा ‘प्रयोग’ करण्यात आला. तथापि, सोलापूर लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेबरोबरच स्वकीयांनी केलेल्या गद्दारीमुळे शिंदे यांना दारुण पराभव पत्करावा लागला. त्यानंतर शिंदे यांच्यासमोरील अडचणी वाढल्या तर कोठे गट आक्रमक झाला. त्यामुळेच की काय, केवळ अकरा महिन्यांच्या अत्यल्प कालावधीतच धडाकेबाज आयुक्त गुडेवार यांच्या बदलीचे नाटय़ घडले. गुडेवार हे बदलून जाताच महेश कोठे यांना काँग्रेस पक्ष पुन्हा प्रिय वाटू लागला खरा; परंतु त्यांनी पुन्हा आक्रमक पवित्रा घेत शिंदे यांची कोंडी करण्याचा जणू चंग बांधला. शिंदे यांच्या कन्या आमदार प्रणिती शिंदे यांच्या सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातूनच महेश कोठे यांनी मिळेल त्या कोणत्याही पक्षाकडून निवडणूक लढविण्याची भाषा सुरू करून शिंदे यांना उघडपणे आव्हान दिले. त्यांची विधाने प्रसार माध्यमांतून प्रसिद्ध होत असताना अखेर प्रदेश पक्षश्रेष्ठींनी त्यांच्याविरुद्ध शिस्तभंगाची नोटीस बजावली.
या घटनेनंतर दुसऱ्याच दिवशी शिंदे यांनी सोलापुरात धाव घेऊन पक्ष कार्यकर्त्यांच्या बैठका घेण्यास सुरुवात केल्यामुळे हा चर्चेचा विषय झाला आहे. तर दुसरीकडे महेश कोठे यांनी शिंदे हे सोलापुरात आले असताना त्यांची भेट घेणे व त्यांच्या बैठकांना उपस्थित राहणे टाळल्याचे दिसून आले. शिवसेना किंवा भाजपमध्ये जावे की काँग्रेस पक्षातच कायम राहावे या विषयी कोणती भूमिका घ्यावी, याबद्दल महेश कोठे हे संभ्रमात पडल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांकडून सांगण्यात आले. कोठे हे काँग्रेसमधून बाहेर पडल्यास महापालिकेतील काँग्रेसची सत्ता धोक्यात येऊ शकते. अर्थात, या घडामोडींमागचे खरे सूत्रधार त्यांचे वडील विष्णुपंत कोठे हेच असून महेश कोठे हे वडिलांच्या सल्ल्याशिवाय कोणताही राजकीय निर्णय घेणार नाहीत, असेही मानले जाते.